साखर उद्योगामुळे जगभर पसरले भारतीय लोक

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या वाचकप्रिय सदरातून. या सदरात ते लिहिताहेत, साखर उद्योगाचा मानवी स्थलांतरावरील प्रभाव… भारताच्या संदर्भाने ही मालिका असेल, ती नक्कीच सर्वांना आवडेल – संपादक
दक्षिण अमेरिका खंडात ऊसाचा प्रवेश :

दक्षिण अमेरिकेतील नवीन जगाच्या शोधात जाताना ऑगस्ट १४९२ सालामध्ये ख्रिस्तोफर कोलंबस हा कॅनरी बेटावर ला गोमेग येथे वाईन व पाणी घेण्यासाठी चार दिवस थांबला, नंतर तो तेथील गर्व्हनर वेस्ट्रीज दी बोनेडीला ऑसोरिया हिच्या आग्रहाखातर आणखी महिनाभर तेथे थांबला.
ज्यावेळेस तो परत निघाला त्यावेळेस तिने कोलंबसला ऊसाची रोपे दिली. त्याने ती नवीन जगात नेली. अशा रीतीने युरोपीयनांनी शोधलेल्या नवीन जगात ऊसाचा प्रवेश झाला. दक्षिण अमेरिकेत सन १५०१ च्या सुमारास हिस्पानीओला म्हणजे आजचे हैती व डॉमिनिक रिपब्लिक या देशांत त्यानंतर पहिल्यांदा ऊसाची लागवड मोठया प्रमाणावर झाली.
बार्टर पध्दतीने आफ्रिका, युरोप व द. अमेरिकेत चाललेला गुलामांचा व्यापार :
कॉलनी काळात नवीन जगातील अफ्रिकेतील गुलामांचा वापर करुन तयार केलेला कच्चा माल युरोपात नेऊन त्यापासून उत्पादन होत असे. मळीच्या स्वरुपात हा कच्चा माल इंग्लंडला जाऊन त्यापासून रम तयार होई. मिळणा-या नफ्यातून इतर माल घेतला जाई. तो पूर्व आफ्रिेकेत विकला जाई. हा माल बार्टर पध्दतीने (वस्तूंची देवाण घेवाण ज्या व्यापारात करत होते तो व्यापार, वस्तू विनिमय पद्धत) विकला जाई.


या मालाच्या बदल्यात गुलामांची खरेदी होई. साखरेच्या व्यापारातून खरेदी केलेले गुलाम कॅरेबियान बेटांवर ऊसाच्या मळयात काम करण्यासाठी आणले जात. या गुलामांच्या तेथे होणार्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यातून आणखी साखर खरेदी केली जाई. ती युरोपात आणली जाई हे व्यापारी दुष्टचक्र बरीच शतके चालले. ब्रिटीश वसाहतींमधील गुलामांना सन १८३३ मध्ये ब्रिटनने स्वातंत्र्य दिले, तोपर्यन्त हा कार्यक्रम अव्याहत चालू होता.
साखरेच्या हव्यासापोटी वसाहतीची साम्राज्यवाद्यांकडून देवाणघेवाण :
फ्रान्सने साखर उत्पन्न करणारी येथील वसाहतीची बेटे खूप महत्वाची मानली. त्यांनी त्या बेटांच्या बदल्यात नेहमी बर्फाने झाकलेला त्यांच्या ताब्यातील उत्तर अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडाचा भाग ग्रेट ब्रिटनला दिला. त्याबदल्यात ग्रेट ब्रिटनने फ्रान्सला दक्षिण अमेरिकेतील कॅरेबियन बेटे ग्वाडेलुप, सेंट मार्टिनीक व सेंट ल्युसिया त्यांच्या दरम्यान चालू असलेल्या ७ वर्षाच्या युध्दानंतरच्या तहात दिली. डचानीही याच पध्दतीने साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची दक्षिण अमेरीकेतील सुरीनाम ही कॉलनी न्यू नेदरलँड ( न्यूयॉर्क ) च्या बदल्यात स्वत:कडे ठेवली. साखरेच्या हव्यासापोटी हा जागतिक इतिहास निर्माण झाला. साखरेच्या या व्यापारावर वर्चस्व मिळवण्यासाठी इंग्लड व फ्रेंच यांच्यामध्ये अनेक युध्दे झाली. त्यातून वसाहतीवरील कब्जा बदलणे, नवीन वसाहती तयार करणे, असे उदयोग त्या काळात जोमात होते.
दक्षिण अमेरिकेतील इतर देशांत ऊसाने पसरले पाय :-
ब्रिटिश व फ्रेंच दर्यावर्दींनी त्यानंतर नवीन जगात नवनवीन जातींच्या ऊसाचे वाण युरोपातून आणली. कॅब्लीग यांनी कोलबंसनंतर ३ वर्षात सेंट व्हिन्सेंट बेटावर ओशनियामधून नवीन जातीची ऊस रोपे आणली. सन १५०० मध्ये पेट्रो गँब्रिएल हा पोर्तुगीज अपघाताने ब्राझीलला उतरला व तेथेच स्थिरावला. त्याने तेथे ऊस मळे तयार केले. त्यानंतरच्या ४० वर्षांमध्ये सन १५४० चे सुमारास साखर निर्माण करणारे ८०० उदयोग सँटा कॅटरिना बेटावर होते. तसेच ब्राझीलच्या उत्तर किना-यावर तसेच डेमानारा व सुरीनाम मध्ये २ हजार साखरेशी संबंधित उदयोग उभे राहिले होते.
ऊसाची पहिली लागवड सन १५०१ मध्ये हिस्पानिओला येथे झाली. ब-याच प्रमाणात सन १५२० पर्यंन्त क्युबा व जमैका येथेही साखर उदयोग उभे राहिले होते. सन १५२० पर्यंत मध्य अमेरिकन देश मेक्सीकोमध्ये ऊस लागवड सुरु झाली. स्पॅनिश दर्यावर्दी कॉटेझ याने पहिला साखर कारखाना१५३५ सालामध्ये उत्तर अमेरिकेत सुरु केल्याचा इतिहास आहे. ऊस लागवड त्यानंतर पेरु, ब्राझील, कोलंबिया, व्हेनेझुएला या देशामध्ये पसरली. पोर्टोरिकोमध्ये सन १५४७ मध्ये साखर फॅक्टरी सुरु झाली. सन १५४७ मध्ये साखर फॅक्टरी सुरु झाली. सन १६०० पर्यंत उष्णकटीबंधीय, समशितोष्ण कटिबंधीय अमेरीकेमध्ये साखर उद्योगा हा सर्वात मोठा व आर्कषक उद्योग होता. साखरेचे उत्पादन करणा-या या बेटांनी तत्कालीन रॉयल इंग्लंड व फ्रेंच खजिन्यात मोठया संपत्तीची भर घातलेली आहे.
इ.स. १५५० पर्यंत शोधलेल्या या द. अमेरिकेतील नवीन जगात सुमारे ३ हजार साखर निर्मिती करणारे उद्योेग उभे राहिले होते. या उद्योगांना लागणारी लोहाची यंत्रसामुग्री, साचे, मशिनरी, लोखंडाचे गिअर्स, रस काढणारी यंत्रणा, लिव्हर्स इत्यादी अनुषंगिक मशिनरी लागत असे, त्याची मागणी वाढल्याने अशी मशिनरी तयार करण्यासाठी युरोपातील देशात स्पर्धा सुरु झाली.
तेथील व्यापारी उदयोग जगतात या वस्तू तयार करणा-या उद्योगांची आश्चर्यकारक वाढ युरोपात झाली. जस जसा येथील साखर धंदा वाढला, तस तशी युरोपातून साखरेसाठी मशिनरी निर्माण करणा-या उद्योगाला बहारीचे दिवस आले. १७ व्या शतकापर्यंत या उद्योगात नवनवीन संशोधन व प्रयोग करण्यात आले. नवीन जगात १५ व्या शतकात सोन्याच्या खजिन्याचा शोध चालू असताना वेस्ट इंडिज व दक्षिण अमेरीकेत साखर उदयोग हळूहळू वाढू लागता होता.
स्पॅनिशांनी सुरु केलेला हा उद्योग तेथे सर्वत्र पसरला. सन १६२० ते १६४० सालापर्यंत ब्रिटिशांनी बार्बोडोस मध्ये वसाहत स्थापन केली. त्या काळात सुरवातीला निळ, तंबाखू, व कापूस याची लागवड होत असे. सन १७०० मध्ये ऊसाचा तेथे शिरकाव झाल्यावर काही वर्षातच तेथील लोकसंख्या ३० हजारपर्यंत वाढली. १३०० ऊस लागवडीचे मळे व ५०० साखर उदयोग तेथे कार्यरत होते. हे उद्योग जनावरे किंवा वा-याच्या शक्तीवर चालत. बार्बोडोसमध्ये ८००० टन साखर वर्षात तयार होत होती. सरासरी १५ टन / फॅक्टरी असे तिचे प्रमाण होते. अँटीगुआ, जमेका या साखर उद्योगातील अग्रेसर वसाहती त्यानंतर झाल्या. फ्रेंचानीही त्यांच्या मार्टिनिक, ग्वाडेलूप या वसाहतील साखर उत्पादनास जोमाने सुरुवात केली होती.
इ.स. १६२५ नंतर डचांनी ऊस दक्षिण अमेरिकेतून डच कॉलनी, गियाना, डेमारा, सुरिनाम, ब्राझीलचा काही भाग (न्यू हॉलंड) या त्यांच्या वसाहतीमध्ये नेल कॅरेबियन बेटृे बार्बोडोस, व्हर्जिन आर्यलँड बेटावरही त्याची लागवड करण्यात आली.
ऊसाच्या लागवडीसाठी व साखर उत्पादनांसाठी गुलामांचा छळ– एक काळाकुट्ट इतिहास :

नवीन जगात कामासाठी गुलामांचा वापर त्याकाळी सर्वमान्य होता. स्थानिक लोक व वसाहतीतून , युरोपातून आणलेले लोक या नवीन जगात साखर तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या उद्योगासाठी लागणारी कष्टदायक कामे करु शकत नव्हते. सर्वप्रथम इंग्लंडमधून या कामासाठी राजकीय विरोधक, तुरुंगातील कैदी, फाशीची शिक्षा दिलेले कैदी आणत. मग मागणी व पुरवठा या सुत्रात हे बसत नव्हते. .
ऑलिव्हर क्रॉमवेलने क्रुरपणे शिक्षा दिलेले १०० जण जेफ्री याने सन १६८६ मध्ये मेडगमुरच्या युध्दात पकडलेले शरणार्थी व पराजित यांना या कामासाठी इथे पाठवले. त्यानंतर त्याकाळात आफ्रिकेतून गुलाम आणून वसाहतीमध्ये असलेल्या साखर उद्योगातील कष्टदायक कामे करण्यासाठी या गुलामांना वापरण्याची पध्दत पोर्तुगीजांनी प्रथम सुरु केली. कोलंबसनेही त्याचे बरोबर गुलाम नेले होते. क्युबामधील गुलामगिरीवर स्पेनच्या राजाने कायदेशीर, असे शिक्कामोर्तब केले होते. ही परवानगी किंवा रीळर्शीीें नंतर ब्रिटिश व फ्रेंचातील १७१३ च्या उष्ट्रेष्टच्या (Utrecht) झालेल्या तहानंतर ब्रिटिशांच्या मालकी हक्कात वाढ झाली होती.
सन १७८९ पर्यंत ही प्रथा चालू होती. कॅरेबियन बेटांत आफ्रिकन गुलामांच्या आयातीने स्थानिक संतुलन बिघडले होते. यात गुलामीस विरोध करणा-या चळवळीही कार्यरत होत्या. मानवतावादी चळवळी जोमात असल्या तरी साखर तयार करण्याच्या कष्टदायक कामात हे गुलामच काम करु शकत होते. या मताशी सर्व साम्राज्यवादी देश ठाम होते. सेंट किट्स बेटाच्या कॉन्सेलर यांनी ब्रिटिश पार्लंमेंटला लिहिलेल्या त्याकाळच्या पत्रात नवीन जगात आफ्रिकन गुलामांकडून ऊस लागवड करणे कसे योग्य आहे याचे समर्थन केले आहे. दुष्काळ, गरमी, हरिकेन्स वादळे, प्लेग, ऊसावर पडणारे रोग त्यामुळे कमी झालेले उत्पादन या ही गोष्टी त्या काळात होत्या.
युरोपातून कापड, मशिनरी, खेळणी घेऊन जहाजे पश्चिम आफ्रिकेत जात. तेथून त्या काळात सोन्याची धूळ ( Gold dust ) व गुलाम मिळवत, समुद्र किनार्याच्या आदीम जमाती मधील त्यांचे विरोधक व अंतर्भागातील इतर जमातीचे लोक गुलाम म्हणून पुरवत. हे गुलाम दक्षिण अमेरिकेत नेऊन वेस्ट इंडिजमध्ये विकत व तेथून युरोपासाठी साखर व रम याची खरेदी होई.
युरोप , पश्चिम आफ्रिका व दक्षिण अमेरीका या दरम्यान चाललेल्या या त्रिकोणी पध्दतीने हा व्यापार अनेक शतके चालला. याचे अनिष्ट परिणाम युरोप, दक्षिण अमेरिका व अफ्रिका या तीन खंडातील समाज जीवनावर खूप झाले. या खंडात साखर उद्योगामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय अशी खूप स्थित्यंतरे झाली. साखरेमुळे या तीनही खंडातील सर्वच क्षेत्रात उलथापालथ झाली. हा केवळ गोड साखरेच्या हव्यासापोटी घडलेला इतिहास आहे.
गुलामगिरी विरुध्द लढा
गुलामगिरी विरुध्द सुरु असलेल्या मानवाधिकार चळवळींनी इंग्लंडमध्येही जोर धरला होता. इंग्लंडमध्ये जॉन लॉक या विचारवंताने सन १६८९ मध्ये या गुलामगिरीची देशाला काळिमा फासणारी पद्धत असे वर्णन केले आहे. सन १७८९ मध्ये विल्यम विल्हेफोर्स रॉयल हाउस सभासद यांनी पार्लमेंटमध्ये यास विरोधास सुरुवात केली, तरी गुलामगिरीची प्रथा पार्लंमेंटमध्ये बंद होण्यास सन १८३३ हे साल उजाडावे लागले.
सन १७८१ मध्ये ब्रिटिश पार्लंमेंटमध्ये स्लेव्ह ट्रेड अॅबॉलिशन बिल फेटाळले गेले. मात्र गुलामगिरी विरोधातील चळवळीने जोर धरला. गुलामांचा छळ करुन तयार केलेल्या साखरेवर ठिकठिकाणी बहिष्कार घातला जाऊ लागला, तेव्हा भारतीय साखरेस मागणी वाढली. उत्तर अमेरिकन लोकांनीही मॅपल झाडापासून साखर बनविण्याचा उद्योग सुरु केला. १७८९ सालानंतर मॅपलच्या झाडापासून साखर बनविण्याचा उद्योग संयुक्त संस्थानात वाढला. सन १८०७ मध्ये थॉमस जेफरसन या तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेत गुलाम आयात करण्यास बंदी घालणा-या बिलावर स्वाक्षरी केली. ही ऐतिहासिक महत्वाची बाब अमेरिकेच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात महत्वाची मानली जाते. नंतर ब्रिटिश पार्लमेंटनेही गुलामाच्या व्यापारास बंदी घातली. तरीही गुलामगिरीची प्रथा साखर उद्योगातील कष्टदायक कामे करण्यासाठी अगदी अलीकडे १८८८ सालापर्यंत सुरु राहीली.
गुलामगिरी संपल्यानंतरचे स्थित्यंतर

गुलामगिरची प्रथा बंद झाल्यावर कराराने या कामासाठी पोर्तुगाल, भारत व चीन या देशामधून मजूर आणण्यात आले. साखरेच्या व्यापारात सुरवातीस आणलेल्या चीनी व पोर्तुगीज मजूरांची कष्टदायक या कामातून सुटका करुन स्थानिक व्यापार व दुकाने थाटली. दक्षिण अमेरिकेत व दक्षिण आफ्रिकेत भारताबाहेर साखरेच्या हव्यासापोटी आणलेल्या भारतीय मजूरांनी सर्वाधिक लोकसंख्या व्यापली आहे. नवीन लोकांकडून उत्पादित केलेल्या साखरेवर अशी लेबल्स लावून गुलामगिरीचाच हा व्यापार सन १८३३ नंतर कराराने बराच काळ चालू राहिला..
३१ जुलै १८३४ मध्ये कॅरेबियन बेटांवर गुलामगिरीची प्रथा बंद झाल्यावर दक्षिण अमेरिकेत केवळ ब्रिटिश वसाहतीमधून ७.७६ लाख गुलामांची मुक्तता करण्यात आली. स्पॅनिश वसाहतीत ऊस मळ्यात काम करणार्या गुलामांना सुटकेसाठी १८८० साल उजाडावे लागले. चिलीमध्ये १८२३ सालात, मेक्सीकोमध्ये १८२९ सालात व पेरू देशात १८५४ सालांमध्ये, पोर्टोरिकोमध्ये १८७३ सालांमध्ये, क्युबामध्ये गुलांमाच्या छळापासून साखर निर्मिती करण्याची पध्दत बंद झाली..

गुलामीची प्रथा बंद करणारे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हे शेवटचे राष्ट्र होते. त्याने सन १८८८ साली या प्रथेवर बंदी घातली. मार्क अरोनझन व मरीना बुधोज यांनी २०१० मध्ये लिहिलेल्या शुगर चेंजड् द वर्ल्ड या पुस्तकात कोलंबस अमेरिकेला पोहोचल्यानंतरच्या ४ शतकात या साखर उद्योगाच्या वाढीसाठी व हव्यासापायी जवळजवळ किमान १ कोटी १० लाख लोकांना गुलाम म्हणून असहाय जीवन जगावे लागले होते. त्यातील लाखो लोक कायमचे उद्ध्वस्त झाले, त्रस्त झाले, अपंग झाल, मृत्युमुखी पडले.
भारतीय मजुरांना जगभर वाढती मागणी
१७ व्या शतकापासून १९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ऊसाच्या रसापासून कच्ची साखर तयार करण्यासाठी छोटे बॉयलिंग हाऊस तयार करत. पश्चिमात्य वसाहतीत अशी बॉयलिंग हाऊस ऊस लागवडीच्या आसपास टाकली जात. अत्यंत घाणेरड्या, कष्टदायक वातावरणात साखर तयार करण्याच्या प्रक्रिया क्रूर पध्दतीने, गुलामांना राबवून या पाडल्या जात.
त्रिकोणी विटापासून, दगडापासून उष्णता तयार करण्यासाठी भट्टी तयार केली जाई. जी खालून मोकळी असायची त्यातून अग्नी प्रज्वलित केला जाई व राख बाहेर काढली जाई. या भट्टीवर तांब्याची मोठी सात पात्र रचली जात. ही वरच्या दिशने लहान व खालच्या दिशेपेक्षा अधिक गरम असत. सर्वांत मोठया पात्रात ऊसाचा रस ठेवला जाई. त्यामध्ये चुना (Lime) घालून अशुध्दता काढली जाई. शेवटच्या सातव्या पात्रास टिश (Teache) म्हणत. त्यात साखरेचा रस हा शुध्द पाक झालेला असे. त्यानंतरच्या प्रक्रियेत हा पाक थंड केला जाई. साखरेचे स्फटिक मळीच्या भोवती जमा होत. ही कच्ची साखर थंड करुन लाकडी बॅरल्स मध्ये ओतली जाई. त्याला हॉगशीडस म्हणत. जेथून ती क्युरिंग हाऊसमध्ये आणली जाई.
सुरवातीच्या काळात पश्चिम आफ्रिकेतून गुलामांच्या व्यापाराव्दारे ऊसाच्या मळ्यात काम करण्यासाठी लाखो गुलाम पोर्तुगीजांकडून आणण्यात आले. गुलामांचे झालेले हाल पूर्व आफिक्रेच्या इतिहासातील अतिशय काळाकुट्ट कालखंड मानला जातो. अत्यंत क्रुरपणे या गुलामांना वागवले जाई. कष्टदायक कामे, अपुरे अन्न, रोगराई यामुळे हजारो गुलाम मृत्युमुखी पडले, जायबंदी झाले. गुलामगिरीची प्रथा ब्रिटिश वसाहतीमधून सन १८३३ नंतर नष्ट झाल्यानंतर दक्षिण अमेरीकेतील ब्रिटिश वसाहतीमध्ये ऊस शेतीसाठी काम करण्यासाठी स्वस्त मजूरांची आवश्यकता निर्माण झाली. ही गरज सन १८३३ नंतर हिंदुस्थानातील मजूरांकडून भागविण्यात आली.
चीन, ब्रिटिश हिंदुस्थानमधून तसेच पोर्तुगाल देशाच्या आशियायी देशातील वसाहतीतून स्वस्त मजूर घेतले गेले. खूप लांबच्या कालावधीचे करार त्यांच्याशी केले जात. दरम्यानच्या काळात सवलती व मेहनताना यामध्ये फारशी वाढ नसे. ही एक प्रकारे छुपी गुलामीच होती. युरोपीयन साम्राज्यवाद्यांना साखरेच्या हव्यासातून बहुमतांशी भारतीय, चायरनीज, पूर्व एशियन हे दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका खंडात स्थलांतरित झालेले आहेत. केवळ साखरेच्या हव्यासापोटी झालेल्या स्थलांतराचा हा एक इतिहास आहे.
अमेरिका खंडातील बहुमतांशी सर्व देशांमध्ये या आशियायी वंशांच्या लोकांचे प्रमाण आजमितीस एकूण लोकसंख्येच्या १० ते ५० टक्के आहे. हे आशियन समूह तत्कालीन वसाहतवादी ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीजांमार्फत प्रशांत महासागरातील फिजी, दक्षिण आफ्रिका, आशियातील ब्रह्मदेश (आताचा म्यानमार), श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपीन्स, दक्षिण अमेरिकेतली ब्रिटिश गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, मार्टिनिक्स, फ्रेंच गयाना, ग्वाडेलुप, ग्रेनडा, सेंट ल्युसिया, सेंट व्हिन्सेट, सेंट किटस्, सेंट कॉक्स, सुरीनाम, नेव्हीस व आफ्रिकेतील मॉरिशसमध्ये पसरले गेले, तेथील एतद्देशीय व या स्थलांतरित लोकांमध्ये संकर होऊन मिश्र वंशीय संस्कृती उदयास आली. या सर्वांच्या मागचे मुख्य कारण होते गोड पांढरी शुभ्र साखर.
साखरेमुळे जगभर स्थलांतरित झालेले भारतीय
भारतीय लोक ऊसमळ्यात काम करणे, लागवड जोपासना, साखर तयार करणे यासाठी वेगवेगळ्या देशात गेले. इतिहासात एखाद्या उद्योगासाठी भारतीय लोक कायमचे स्थलांतरित झाल्याचे उदाहरण फक्त साखर या उद्योगाबाबत देता येईल. दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंड सोडता साखर उद्योगासाठी भारतीय लोक प्रशांत महासागरातील फिजीसह अनेक देशात कराराङरे तत्कालीन स्थायिक झालेल्या भारतीय लोकांची संख्या सर्वसाधारणपणे २०१५ च्या जनगणनेनुसार पुढील प्रमाणे आहे.

आजमितीस भारतीय वंशाचे लोक जगभर पसरले आहेत. ते त्या त्या देशांमध्ये सन्माननीय नागरिक झाले आहेत. स्थायिक झालेल्या देशांच्या प्रगतीसाठी व तेथील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्यात ते अग्रेसर आहेत. दक्षिण अमेरिकेतील भारतीय असलेल्या सर्वच देशात, तसेच फिजी, मॉरिशस येथे भारतीय वंशाचे लोक राजकीय, आर्थिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. काही लोक तेथील देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान या पदांपर्यंतही पोहोचले आहेत. जगात उस व त्यानंतर निळ सोडता, इतर कोणत्याही दुसर्या पिकामुळे वांशिक उलथापालथ झाल्याची नोंद नाही.
भारताच्या शोधासाठी निघालेल्या कोलंबसने भारताऐवजी सन १४९२ मध्ये अमेरिकेचा शोध लावला. या शोधानंतर येथे पोर्तुगीज, डच, स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटिश यांनी मुख्यत्वे वसाहती करणे, नवीन प्रांत अमलाखाली आणणे, सोने, बहुमूल्य खनिजांचा शोध घेणे, उसाची शेती करणे, कॉफीच्या मळ्यात काम करणे, साखर उत्पादन करणे यासाठी मोहिमा राबविल्या व तेथे कष्टाची कामे करण्यासाठी प्रथम १५ ते १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत आफ्रिकेतील लोक गुलाम म्हणून आणले. गुलामगिरी विषयक चळवळींना यश येऊन १९ व्या शतकाच्या मध्यंतर दक्षिण व उत्तर अमेरिकेतील दोन्ही खंडातील सर्व राष्ट्रांत टप्प्याटप्प्याने गुलामगिरी कायद्याने बंद झाली.
स्वतः कष्ट करण्याऐवजी दीर्घ कराराने मुख्यत्वे भारतीय उपखंडातील स्वस्त मजूर आणले गेले. भारतातील उत्तरप्रदेश, बिहार प्रांतातील जनसंख्या जास्त प्रमाणात होती. भारतीयांबरोबर चिनी, जपानी लोकही याचप्रकारे आणले गेले. तेथील मूळ स्थानिक, माया, इन्का संस्कृतीतील तसेच रेड इंडियन्स लोक विजनवासात गेले, तेथील संस्कृती लयास पावल्या. उसाची शेती व साखर उत्पादन व व्यापार यातून मिळणारा फायदा लक्षात घेऊन आफ्रिकन लोकांचे स्थलांतर या भागात झाले.
त्यामुळे दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात युरोपियन, आफ्रिकन, भारतीय लोकांचे मिश्रण, भाषेचे मिश्रण यामुळे नवी मिश्रसंस्कृती उदयास आल्या. वसाहतवाद्यांनी पादाक्रांत केलेला देश, त्यांच्या देशातील वसाहतीतील तिथे कामाला आणलेली लोक, त्यांत गेली ४०० वर्षांत झालेला धार्मिक, वांशिक छळ, सती वगैरे घटनांच्या परिणामावर आजचे त्या देशातील भाषिक, वांशिक मिश्र संस्कृतीचे प्रमाण दिसून येते.
(क्रमश:)




