कार्यकारी संचालक चाळणी परीक्षेत १४ उमेदवार नापास
शिंदे ठरले अव्वल, पात्रतेसाठी ७० गुण
पुणे : सहकारी साखर कारखान्यांकरिता कार्यकारी संचालकांची तालिका (पॅनल) करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक (चाळणी) परीक्षेत २३९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, १४ जण नापास झाले आहेत.
वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण संस्थेमध्ये ५ एप्रिल रोजी प्राथमिक परीक्षा झाली होती. त्याचा निकाल आज जाहीर झाला. कार्यकारी संचालकांची तालिका तयार करणे ही संकल्पना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची आहे.
या पदासाठी प्राथमिक परीक्षा घेण्याचे ठरले आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले तेव्हा ४४८ अर्ज आले होते. मात्र अवघे २५३ उमेदवार पात्र ठरले. त्यांची परीक्षा वैकुंठभाई मेहता संस्थेने घेतली. २५३ पैकी २३९ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुख्य परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
दोनशे गुणांच्या चाळणी परीक्षेमध्ये विश्वजित विजयसिंह शिंदे हे १४६ गुण घेऊन अव्वल ठरले आहेत. ७० आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे सर्व उमेदवार अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ७० गुण म्हणजे काठावर पास होणाऱ्या उमेदवारांची संख्या तीन आहे.
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे
आधीचे वृत्त