अतिरिक्त बी-हेवी पासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी मिळणार?
नवी दिल्ली : साखर कारखान्यांना त्यांच्या अतिरिक्त बी-हेवी मोलॅसेसचा इथेनॉल तयार करण्याची परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे, साखरेचा मुबलक पुरवठा आणि स्थिर किमतीमुळे सरकार धोरणात बदल करण्याची शक्यता आहे.
सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी इथेनॉल उत्पादनावर बंधने जाहीर केली होती. सध्या, साखर कारखान्यांकडे 8 लाख टनांपेक्षा जास्त बी-हेवी मोलॅसेसचा अतिरिक्त साठा आहे.
एका आठवड्यानंतर, सरकारने बंदी मागे घेतली आणि उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसेस दोन्ही वापरण्यास परवानगी दिली. परंतु 2023-24 पुरवठा वर्षासाठी इथेनॉल उत्पादना करिता 17 लाख टन साखर वळवण्याच्या एकूण मर्यादेत परवानगी दिली.
“साखर उद्योगाने क्रशिंग संपल्यानंतर इथेनॉल बनवण्यासाठी बी-हेवी मोलॅसिसचा संग्रह करून ठेवला. मात्र सरकारने त्यावर अचानक बंदी आणून अधिकतम मर्यादा लागू केली. साखर कारखान्यांकडे आता बी-हेवी मोलॅसेसचा अतिरिक्त साठा आहे,” सूत्रांनी पीटीआयला सांगितले.
आता गाळप संपुष्टात येत असताना, साखर उद्योग सरकारकडे बी-हेवी मोलॅसेसचा उपलब्ध अतिरिक्त साठा इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहे. हा प्रस्ताव विचाराधीन आहे. यावर चर्चा सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
2023-24 हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) देशांतर्गत साखरेचे उत्पादन 300 लाख टनांपेक्षा जास्त झाले आहे, जे देशाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे आणि साखरेच्या किरकोळ किमतीही स्थिर आहेत, हे लक्षात घेऊन या प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
चालू 2023-24 हंगामात 17 लाख टन साखरेचे उत्पादन वगळून 315-320 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.