‘आदिनाथ’च्या २१ जागांसाठी उद्या मतदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

करमाळा : येथील आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण २१ जागांसाठी हे मतदान होत आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, यानिमित्त सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ‘आदिनाथ’ च्या निवडणुकीच्या निमित्ताने आठ दिवसांपासून गटवार जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. तसेच सभासद शेतकरी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर उमेदवारांनी भर दिलेला होता.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्याविरुद्ध माजी आमदार संजयमामा शिंदे व प्रा. रामदास झोळ या तिघांचे पॅनल निवडणुकीत उभे असले तरी खरी लढत आजी माजी आमदारांच्या पॅनलमध्ये होत आहे. या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण पाटील हे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग या गटातून निवडणूक रिंगणात उभे आहेत, तर माजी आमदार संजय मामा शिंदे केम ऊस उत्पादक गटातून लढत् देत आहेत.

दरम्यान, बिनविरोधाची भूमिका घेणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेस खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमवेत उपस्थिती लावल्यानंतर कोणत्याही प्रचार सभेत ते उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर आज पत्रकारांनी त्यांची भूमिका जाणून घेतली असता आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आजही पंचाच्याच भूमिकेत असल्याचे ठामपणे सांगितले. यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार झाली असल्याची चर्चा सुरू आहे.

बागल गट तटस्थ

निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर बागल गटाच्या वतीने कोणाला पाठिंबा दिला जाणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात असताना मंगळवारी बागल गटाच्या संपर्क कार्यालयात बैठक घेऊन आपल्या इच्छेनुसार मतदान करण्याचे आवाहन केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »