ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू

मदतीसाठी नातेवाईकांचे ‘बिराजदार’ कारखान्यात आंदोलन
उमरगा : तालुक्यातील कोंडजीगड येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यात (क्युनिर्जी इंडस्ट्रीज) एका दुर्दैवी अपघातात ‘रीलस्टार’ ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा ऊसाखाली दबून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी शुक्रवारी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी कारखाना बंद पाडून गव्हाणीत ठिय्या आंदोलन केले.
नेमकी घटना काय?
दोन दिवसांपूर्वी कारखाना परिसरात काम सुरू असताना गणेश डोंगरे यांचा ऊसाखाली दबून मृत्यू झाला होता. गणेश यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे आणि मुलांचा आधार हिरावला असून कुटुंब उघड्यावर पडले आहे. प्रशासनाकडून मदतीचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या डोंगरेवाडी येथील ग्रामस्थांसह सुमारे ५०० लोकांनी शुक्रवारी सकाळी कारखान्यावर धडक दिली.
आंदोलकांनी कारखान्याच्या गव्हाणीत ठाण मांडल्यामुळे साखर कारखान्याचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. जोपर्यंत कुटुंबाला भरीव आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.
कारखान्याची भूमिका:
या घटनेवर बोलताना कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार म्हणाले की, “गणेश डोंगरे यांचा मृत्यू ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. कारखान्याकडून त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आम्ही मान्य केले आहे. मात्र, गाळप बंद ठेवणे योग्य नसून आंदोलकांनी सहकार्य करावे.”
कारखान्याने मदतीचा शब्द दिला असला, तरी प्रत्यक्षात मदत मिळेपर्यंत आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते.






