ऊस शेतीसाठी एकात्मिक प्रयत्न हवेत : कुलगुरू डॉ. पाटील
पुणे : देशाच्या कृषी विकासात ऊस पीक मोलाची भूमिका बजावते आहे. मात्र जमिनीची सुपीकता खालावल्याने सरासरी ऊस उत्पादन व साखर उताराही घटतो आहे. त्यामुळे ऊस शेतीकरिता आता एकात्मिक प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एल. पाटील यांनी केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) मांजरी बुद्रुक येथे मुख्यालयात बुधवारी (ता. ३०) आयोजिलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना डॉ. पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ऊस संशोधन संस्थेचे माजी संचालक व कुलगुरू डॉ. एस. सोलोमन, व्हीएसआयच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. इंद्रजित मोहिते, सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील, व्हीएसआयचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, “साखर उद्योगावर लाखो शेतकरी व कामगार अवलंबून आहेत. मात्र पाणी व खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे ऊस शेतीमधील अडचणी वाढल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी संशोधन संस्था, साखर उद्योग व शेतकऱ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील.” हवामान बदलामुळे देशाचे ऊस उत्पादन आणखी घटू शकते, असा इशारा डॉ. सोलोमन यांनी दिला.