एकात्मिक शेती व्यवसायामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर

डॉ. दशरथ ठवाळ,
माजी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पुणे-५,

स्थानिक परिस्थितिनुसार तेथील असणाऱ्या वातावरणाशी समन्वय साधून त्याचबरोबर अनेक उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचा विचार करून शेतीशी निगडीत असणाऱ्या अनेक व्यवसायांचा अवलंब करणे. एकूण शेती उत्पादनात आणि उत्पन्नात भर टाकणे, जेणेकरून शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता येण्यास मदत होईल.
एकात्मिक शेतीमध्ये विविध व्यवसायांचा अंतर्भाव :
शेतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा (जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इ.) त्याचबरोबर उपलब्ध असणारे मनुष्यबळ, बाजारपेठ अशा अनेक गोष्टींचा विचार करून कृषी आधारित विविध व्यवसाय सुरू करता येतील. उदा. बिजोत्पादन (स्वतःचे बियाणे स्वतः तयार करणे), रेशीम उद्योग, गांडूळ खत प्रकल्प, कुक्कुटपालन, ससे पालन, मत्स्य शेती/ बदक पालन (पाणी सुविधा असल्यास), दुग्ध व्यवसाय (गाई / म्हैस), शेळी मेंढी पालन (सोलापूर विभाग), सुगंधी आणि औषधी वनस्पति उत्पादन, अळिंबी उत्पादन, बेकरी व्यवसाय, फळ प्रक्रिया (स्थानिक फळ उत्पादनानुसार) असे अनेक विविध व्यवसाय सुरू करण्यास वाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
आज नोकरीसाठी बेकार तरुणांचा ओघ आपोआपच कमी होण्यास मदत होणार आहे. देशाची आर्थिक परिस्थिती ही शेतीवर अवलंबून असूनही खऱ्या अर्थाने शेतीला व्यवसायाचे स्वरूप निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे ? आज आपण पाहतो की भारतीय अंदाजपत्रकात प्राथमिक क्षेत्र म्हणून शेतीला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. देशाची एकंदरीत आर्थिक प्रगती मुख्यत्वेकरून शेतीच्या होणाऱ्या प्रगतीवरच अवलंबून आहे, हे जरी खरे असले तरी अद्यापी म्हणावे तितके शेतीला व्यवसायाचे खरे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येत नाही. परंतु जागतिक परिस्थितीला तोड द्यायचे असेल तर शेतकऱ्यांना एकात्मिक शेती व्यवसायाकडे वळावे लागणार आहे.
खऱ्या अर्थाने ही काळाची गरज आहे. शेतकरी बंधूनी या पुढच्या काळात खुल्या जागतिक व्यापार व्यवस्थेत शेती व्यवसाय टिकून प्रगती साधावयाची असेल तर कृषी उत्पादन, शेतमाल विक्री (पणन व्यवस्थापन), पत पुरवठा, कृषी माल प्रक्रिया, त्याचबरोबर कृषी मनुष्यबळ व्यवस्थापन या बाबींचा एकत्रित विचार करून त्याचे सुयोग्य नियोजन, त्याचबरोबर शेतीमाल उत्पादन वाढीसाठी एकात्मिक शेतीमध्ये पीक नियोजनात पाण्याचा कार्यक्षम वापर हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याची उपलब्धता :
एकात्मिक शेती व्यवसायामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ते पाणी किती आणि कसे
उपलब्ध आहे ? पाणी हे निसर्गः उपलब्ध असून सर्व प्राणी मात्रांना जीवन जगण्यासाठी पाणी अत्यंत
गरजेचे आहे. दिवसेंदिवस पाण्याची मागणी पिण्यासाठी, उद्योगधंदे, वीज निर्मिती तसेच शेतीसाठी
वाढत आहे. यामध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याला प्राधान्यक्रम शेवटी दिल जातो.
देशात वार्षिक सरासरी ११७ से.मी. पाऊस पडतो. त्यापासून ४०० दशलक्ष हेक्टर मीटर पाणी उपलब्ध असते. त्यापैकी शेतीसाठी भूपृष्ठावरील ७० दशलक्ष हेक्टर मीटर पाणी तसेच ३५ दशलक्ष हेक्टर मीटर पाणी जमिनीखालून वापरले जाते. या एकूण उपलब्ध पाण्याच्या ६८ % पाणी सद्या देशात शेतीसाठी वापरले जाते. हे पाणी भविष्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याकरिता एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेतीचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढविणे खऱ्या अर्थाने गरजेचे आहे.
एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर :
एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करता येईल ? जेणेकरून शेतीचे उत्पादनात वाढ होईल. एकात्मिक शेती व्यवसायमध्ये उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेती उत्पादनात निश्चितच वाढ करता येईल. जमिनीवरील तसेच भू-गर्भातील एकूण पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार पीक नियोजन करून पाण्याचा कार्यक्षम वापर पिकांना तसेच इतर शेती व्यवसायासाठी करून शेती उत्पादन वाढवीत येते. त्याचबरोबर शेतावर वर्षभर रोजगार निर्मिती होऊन शेतीतील आर्थिक उत्पन्न वाढवीत येईल. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी पिकांना पाटाने पाणी न देता ते ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सूक्ष तुषार सिंचन, सूक्ष्म दव बिंदू सिंचन, रेनगन सिंचन इ. पद्धतींचाच अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करून पाण्याची बचत केली पाहिजे. असे बचत केलेले पाणी इतर शेती व्यवसायासाठी निश्चितच वापरता येईल.
पावसाचे शेतातून वाहून जाणारे पाणी साठवून त्याचे नियोजन करणे :
पावसाचे शेतातून वाहून जाणारे पाणी शेतातअसणाऱ्या शेततळ्यात साठविले पाहिजे. अशा साठविलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब ना थेंब हा शेती उत्पादन वाढीसाठी उपयोगात आणला पाहिजे यासाठी लोकसहभाग, लोकजागृती आणि लोकांची मानसिकता बदलावी लागेल. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे शेत हे पाणलोट क्षेत्र समजून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरवीला पाहिजे. शेतातून वाहह्न जाणारे पाणी शेताच्या खालच्या भागात असणाऱ्या शेत तळ्यात साठवून त्याचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येऊ शकतो अथवा अशा पाण्याचा वापर ठिबक सिंचन पद्धतीने फळबागेस संरक्षक पाणी म्हणून वापर करता येतो.
शेतीसाठी उपलब्ध असणारे एकूण पाणी व त्याचे अंदाजपत्रक :
शेतीमध्ये उपलब्ध असणारे पावसाचे पाणी, विहीरीचे पाणी, कॅनाल / पाटाचे पाणी, बोरवेलचे पाणी या एकूणच उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यापैकी नगदी पिके, तृणधान्य, चारा पिके, फळबाग इ. साठी वर्षभरात किती पाणी लागेल त्याचबरोबर इतर व्यवसाय म्हणजेच दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, कुक्कुट पालन यासाठी किती पाणी लागेल त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.
एकात्मिक शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर व त्याचे प्रारूप (मॉडेल) अल्पभूधारकासाठी करता येईल का ?
आज देशात सुमारे २१ % शेतकाऱ्यांकडे एक ते अडीच एकर जमीन आहे तर ४० % शेतकाऱ्यांकडे एक एकर पेक्षा कमी जमीन आहे. या जमिनीचे पीक उत्पादनासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल, त्याला व्यवसायाची जोड देता येईल त्याच बरोबर उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून प्रत्येक हवामान विभागवार एकात्मिक शेती व्यवसायाचे मॉडेल (प्रारूप) तयार करता येईल. त्यामध्ये सर्वसाधारण तेथील परिस्थितीनुसार शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य शेती, कुक्कुट पालन इ. चा अंतर्भाव करता येईल. एकात्मिक शेती व्यवसायाचे एक आदर्श प्रारूप (मॉडेल) तयार करून आजच्या तरुण वर्गास त्यापासून रोजगार निर्मितीस वाव राहणार आहे. हा तरुण वर्ग नोकरीच्या मागे न लगता शेतीमध्ये स्वतःचा व्यवसाय करू शकतो.
प्रचलित सिंचन म्हणजे पाटाने पाणी देणे यामध्ये बदल घडवून त्याची कार्यक्षमता कशी वाढविता येईल ?
प्रचलित सिंचन पद्धतीत शेतातील पाटामधून पाणी वाहताना जवळपास १/३ पाणी झिरपून जाते. तसेच अंदाजे १/३ पाणी हे शेतातील नियोजनाच्या अभावामुळे खोलवर पाजरून जाते. ते पिकाच्या वाढीसाठी निरुपयोगी ठरते. बऱ्याच प्रमाणात पाणी वाया गेल्यामुळे पाण्याची कार्यक्षमता ३० ते ३५ % मिळते. याउलट ठिबक किंवा फवारा / तुषार सिंचन या आधुनिक आणि कार्यक्षम सिंचनामुळे पिकास पाणी जमिनीत किती खोलिपर्यंत द्यायचे हे नियंत्रित असते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळतो आणि सिंचनाची कार्यक्षमता ८० ते ९०% पर्यन्त मिळू शकते. त्याचबरोबर उत्पादनाचा दर्ज सुधारून उत्पादनात वाढ होते तसेच अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आणता येते.
एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर करत असताना आपल्याकडे उपलब्ध (उदा. २ हे. क्षेत्र) क्षेत्राचे नियोजन कसे करावे ?
chart

सर्वसाधारण २ हे. क्षेत्र असणाऱ्या शेतक-याने १.५० हे. क्षेत्रावर ऊस, सोयाबीन, वांगी, मिरची, गहू, ज्वारी इ. अशा प्रकारची विविध पिके घ्यावीत, तसेच दुग्ध व्यवसायासाठी चारा पिके म्हणून मका, लसूण घास, जयवंत गवत, घ्यावे. फळबाग ४० आर क्षेत्रावर लावावी. त्यामध्ये सीताफळ, अंजीर, आवळा, चिकू, पेरू यापैकी एका फळपिकाचा स्थानिक उपलब्ध बाजार पेठ पाहून समावेश करावा.
या पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा म्हणजेच ठिबक, तुषार, सूक्ष तुषार, यांचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा.
शेतावर (५ आर क्षेत्र) दोन गाई (संकरीत) असाव्यात. एक गाय दूध देत असेल तर त्यावेळी दुसरी गाय गाभण असावी. जेणेकरून दूध विक्रीतून शेतकार्यास वर्षभर पैसा मिळत राहील आणि कुक्कुटपालनात २०० ते २५० पक्षी असावेत त्यांची मांसासाठी दीड महिन्यात विक्री करावी. वर्षातून ४ ते ५ वेळा विक्री करता येते. शेतात (५ आर क्षेत्र) शेततळ्यात मत्स्य पालनासाठी रहू, कटला, मृगल, आणि झिंगे सोडावेत. शेतात इंधन विहीर असल्यास अधून-मधून शेततळ्यात पाणी सोडावे. तेच पाणी पिकासाठी ठिबकने वापरावे. म्हणजे दोन उद्देश साध्य होतात, शेततळ्यात एक वर्षात एक किलो वजनाचा मास तयार होतो. त्यापासून ही पैसे चांगले मिळतात.
एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचे वार्षिक अंदाजपत्रक कसे तयार करता येईल ?
आपल्या भागत (स्थानपरत्वे) सरासरी किती पाऊस पडतो व कसा आणि किती दिवसात पडतो. उदा. ५२० मि.मी. पाऊस हा ४० दिवसात पडतो. १) पाऊस २) बोरवेल / विहीर ३) कॅनाल / पाटाचे पाणी यापासून वर्षभरात किती हे. से. मी. शेतीसाठी उपलब्ध होते, हे आपणास सहज काढत येते.
Chart

एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करता येईल ?
आपण म्हणतो कि, पाण्यासारखा पैसा खर्च करता येतो, पण पाण्यासारखा पैसा खर्च करूनही पाण्याचा एकही थेंब मानवाला निर्माण करता येत नाही. म्हणून पावसाचा पडणारा थेंब ना थेंब साठवून त्याचा कार्यक्षम पदधतीने वापर केला पाहिजे.
पिकाला त्याच्या गरजेनुसार पाणी द्या, यासाठी हवामान, जमिनीचा प्रकार, पिकाची अवस्था या गोष्टी विचारात घ्याव्यात. जमिनीतील ५० % पाणी (ओलावा) कमी झाले की, पाणी दयावे. धरणातील पाणी पिकांना एका ठराविक अवर्तनाने पुरविले जाते. अशावेळी विहीर / बोरवेलच्या पाण्याचा उपयोग पाटपाण्यास पूरक म्हणून करावा, म्हणजे पिकाची उत्पादकता आणि पाण्याची कार्यक्षमता वाढविता येते. पिकामध्ये तसेच फळबागेत आच्छादन करावे, त्यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर ५ ते ६ दिवसांनी लांबविता येईल. (उदा. उन्हाळी हंगामात ऊस, भुईमूग, कलिंगड इ.)
ठिबक सिंचन व फवारा सिंचनाद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर करीत असताना कोणकोणते फायदे होतात?
पिकाची वाढ जोमदार होते. सुमारे २५ ते ३० % उत्पादनात वाढ होते. उत्पादनाची प्रत चांगली असते. प्रवाही सिंचनाच्या तुलनेत ४० ते ६० % पर्यन्त पाण्याची बचत होते. दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आणता येते. ठिबक सिंचनाने पिकांना रात्रिसुद्धा पाणी देता येते. फळझाडांना आच्छादन करावे, नवीन लागवड केलेल्या रोपांना सावली करावी. फळझाडांना मडका सिंचन करावे. ऊस पिकाची वरची ७-८ हिरवी पाने ठेऊन खालची पिवळी व वाळलेली पाने काढून आच्छादन करावे.
एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यास फायदा किती होतो ?
सन २००७ च्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे कि, एकात्मिक शेतीमध्ये पिकापासून पाण्याची उत्पादकता ४९४/- रु. प्रति हे. से. मी. (एक लक्ष लिटर पाणी) आहे. दुग्ध व्यवसायाची पाण्याची उत्पादकता ही ६९१/- रु. हे. से. मी. आहे. तर एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यास एकूण पाण्याची उत्पादकता पाहिली तर ती ३७७/- रु. प्रति हे. से. मी. आहे.
अशा पद्धतीने एकात्मिक शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यास निश्चितच वर्षभर शेतकऱ्याला शेतावर रोजगार निर्मिती होऊन शेतीतील उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागणार आहे.