कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद व्हावी : अनास्कर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : थकीत कर्जांची उत्पन्नाशी निगडित पुनर्बांधणी करावी, रोखीचे व्यवहार पूर्णतः बंद करण्यात यावेत, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद करण्यात यावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी, असा सल्ला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिला.

मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे सुरू असलेल्या दोनदिवसीय राज्यस्तरीय साखर परिषदेत ‘प्रशासकीय व आर्थिक व्यवस्थापन आणि उत्पन्नवाढीचे शाश्वत स्रोत’ या विषयावरील तांत्रिक सत्र 4 जून रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रामचंद्र माहुली, पांडुरंग सहकारीचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, साखर अभ्यासक पी. जी. मेढे आणि राज्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व शेतकरीवर्ग उपस्थित होता.

साखर उद्योगामध्ये राजकारण आणि साखर व्यवसाय हा स्वतंत्र ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करून अनास्कर म्हणाले,‘कारखान्यांनी एफआरपी रकमेसाठी शेतकर्‍यांची बँक खाती कर्ज देणार्या बँकेतच उघडणे आवश्यक आहे. थकीत कर्जांची उत्पन्नाशी निगडित पुनर्बांधणी करावी, रोखीचे व्यवहार पूर्णतः बंद करण्यात यावेत, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद करण्यात यावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी. राज्याच्या आर्थिक विकासाचा साखर उद्योग हा कणा असून, हा उद्योग टिकला पाहिजे. त्यासाठी व्यावसायिक उद्दिष्टांना प्राधान्य देऊन आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. साखर व्यवसायात अनिष्ट प्रथांना कधीच थारा देऊ नका.

’राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रामचंद्र माहुली यांनी तांत्रिक सत्रात ’साखर कारखान्यांचे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत’ यावर मार्गदर्शन केले, तर श्री पांडुरंग सहकारीचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी ‘साखर उद्योगातील खर्च नियंत्रण व उपाययोजना’ यावर मार्गदर्शन केले.

माजी सहकारमंत्री व निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सत्र झाले. त्यामध्ये व्हीएसआयचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी अधिक उत्पादनाकरिता ऊसजाती नियोजनाचे महत्त्व, पाडेगाव मध्यवर्ती ऊससंशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ज्ञ डॉ. भरत रासकर यांनी पाडेगावचे नवीन ऊस वाण आणि व्हीएसआयचे शास्त्रज्ञ ऊस बेणे गुणन व उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »