तब्बल ३० महिन्यांपासून पगारच नाही; ‘भीमा’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील ३० महिन्यांपासून पगारच झाला नाही. या पार्श्वभूमीवर साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दिलीप सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे धरणे तीव्र आंदोलन करण्यात आले.
मागील ३० महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांनाआर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीत संघटनेच्या वतीने साखर कारखान्यासमोर आंदोलन केले होते. याचप्रश्नी २०२३ आणि २०२४ दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमोर थकीत पगार व फंड, तसेच फायनल पेमेंटबाबत बैठक होऊन २०२४ पर्यंत सर्व पगार व थकीत पगार कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर अद्यापही कारखाना प्रशासनाने म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही, असा आरोप कर्मचाऱ्यानी केला आहे.