खुलताबाद तालुक्यात तीन एकरांतील ऊस जळून खाक

खुलताबाद : तालुक्यातील टाकळी राजेराय येथील काटशिवरी भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास तीन एकरांतील ऊस, पाइप, ठिबक आणि दोन हजारांवर बांबू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
काटशिवरी भागात अय्युब मेहताब पटेल, गुलाब हुसेन पटेल आणि अश्पाक गुलाब पटेल यांची उसाची शेती आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास याठिकाणी अचानक शॉर्टसर्किट झाले, त्यामुळे शेतात उभा असलेला जवळपास तीन एकरातील ऊस जळून खाक झाला. तसेच उन्हाळ्यात लागवड केलेले टोमॅटो बांधण्यासाठी विकत आणलेले बांबूही आगीत जळाले. अय्युब पटेल यांचे २० पाइप व ठिबकही जळाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
दरम्यान, आग पसरत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, परिसरात अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. त्यांचे घर्षण होऊ नये म्हणून तारांवर दगड टाकण्यात आले आहे. तसेच काही विजेचे खांबही वाकलेले आहेत. फ्यूज बॉक्स खराब झालेले आहेत. याची दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना होणार नाही, अशी मागणीही येथील शेतकऱ्यांनी केली आहे.