खुशखबर.! राज्यातील १४ कारखान्यांना ३१ कोटींचे अनुदान

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांच्या बायोगॅस आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात आली. ही वीज प्रति युनिट १ रुपये ५० पैसे प्रमाणे महावितरण कंपनीला विक्री करण्यात आली. यातून शासनाकडून १४ साखर कारखान्यांना ३१ कोटी ६१ लाख ९ हजार ७०० रुपये इतके अनुदान देण्यात आले. वीज निर्मितीमुळे अनेक साखर कारखान्यांना हातभार लागला.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, लोकमंगल, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील तर पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, बारामती ग्रो तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोलम ग्लोबल, जालन्यातील कर्मयोगी, नाशिकमधील द्वारकाधीश आदी कारखान्यांचा
समावेश आहे. साखर कारखान्यातून केवळ साखर निर्मिती करुन नफा येत नसल्याने अनेक उपपदार्थ निर्मिती करण्याचे शासनाने धोरण आणले. त्यासाठी स्वस्तात कर्ज, सबसिडी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागील दहा वर्षापूर्वी केवळ साखर निर्मिती करणारे साखर कारखाने आता विज निर्मिती, कागदनिर्मिती, मळी, मद्य निर्मिती करत आहेत. आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कायम स्थिर नसल्याने त्याचा फटका कारखान्यांना बसत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस गाळपास आल्यानंतर वर्षभर बिल अदा करण्यासाठी कारखानदारांची नाकीनऊ येत होती.
अनेक साखर कारखान्यांचे बॅलेन्ससिट खराब झाल्याने बँकांकडून कर्ज मंजूर होत नव्हती. परंतु, उपपदार्थ निर्मितीमुळे साखर कारखान्यातून वेस्ट
जाणाऱ्या पदार्थातून अन्य उत्पादन निघत असल्याने चार पैसे अधिकचे मिळून त्यातून शेतकऱ्यांना ऊस बिल देण्यास सहाय्य होत आहे.