जरंडेश्वर प्रकरणी सोमय्यांनी गाठले ईडी कार्यालय
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून या कारखान्याच्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं जात असून, हा कराखाना न्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. तर आज (गुरुवार) या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी काही शेतकरी सभासदांसह थेट ईडी कार्यालयच गाठलं आहे.
“अजित पवार यांनी केलेला १२०० कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झाला आहे. ईडीने या कारखान्याची संपत्ती जप्त केली होती. न्यायालयाने त्याला मान्यता दिली आहे. माझी भारत सरकार आणि ईडीला विनंती आहे की हा कारखाना पुन्हा २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा,” असं सोमय्या यांनी या अगोदर म्हटलं आहे.
तर, “जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भात आम्ही ईडीला निवेदन दिलं आहे आणि हा कारखाना २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे. याचबरोबर जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध या कारखान्याशी नसेल तर त्यांनी तो कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देत आदर्श उदाहरण ठेवावं.” असंही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज सांगितलं आहे.
सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारासंबंधीची कागदपत्रे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ईडीसमोर सादर केली होती. ही कागदपत्रं सादर करताना सोमय्यांसोबत कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यामुळे अजित पवारांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणामध्ये आता न्यायालयाने संबंधित कारखान्याची संपत्ती जप्त करण्याचा ईडीच्या कारवाईला मान्यता दिली.