दोनशे फुटांवर दुकान असणारा भारत हा एकमेव देश – शेखर गायकवाड
काळानुसार होणारे बदल भारतीय बाजारपेठेने स्वीकारले आहेत. मला काय हवे ते, ही बाजारपेठच ठरवत असते. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना ही वैशिष्ट्ये समजली नाहीत. त्यामुळे कोणत्याही बाहेरून येणाऱ्या शक्ती या बाजारपेठेला वळण देऊ शकत नाहीत, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला.
स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त एस. एम. जोशी सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते सोमवारी संध्याकाळी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी, उपाध्यक्ष सचिन जोशी, सचिव गणपतराज जैन, खजिनदार मोहन कुडचे व्यासपीठावर उपस्थित होते.
भंडारी म्हणाले, पुण्यासह देशभरातील व्यापाऱ्यांनी काळानुसार आपल्या व्यवसायात बदल केले. वॉलमार्टसारख्या कंपन्यांनी देशात येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विरोध झाला. मात्र, रिलायन्स, बिग बझार सारखे मॉल झाले. ते बाजारात टिकू शकले नाहीत. भारतीय बाजारपेठेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे परदेशी कंपन्यांना तिचा अंदाज येत नाही. त्यामुळेच ते तिला आपल्या पद्धतीने वळण देउन ताब्यात घेऊ शकत नाहीत. ही आपली व ग्राहकांची ताकद आहे. त्याउलट भारताप्रमाणे अमेरिकेत घराजवळ छोटी दुकाने सुरू करण्याचे प्रयोग झाले. भारतीय बाजारपेठेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. जगातील पहिले तीन व्यापारी मार्ग सर्वप्रथम भारत आणि चीन यांच्यामध्ये सुरू झाले.
शेखर गायकवाड म्हणाले, भारतीय बाजारपेठ अद्भुत आणि विसंगतीने भरलेली आहे. अनेक मोठ्या किंवा परदेशी कंपन्या याठिकाणी अयशस्वी होतात, त्याचवेळी छोटे व्यावसायिक मात्र आपल्या कौशल्याने येथे मोठे यश मिळवितात. प्रत्येकी दोनशे फुटांवर दुकान असणारा भारत हा एकमेव देश आहे. मात्र, या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसमोर नवी आव्हाने आहेत. काळानुसार त्यांना नवे बदल स्वीकारावे लागतील. नव्या पिढीला व्यापाराचे धडे द्यावे लागतील. व्यवसायामध्ये नाविन्यता आणून ग्राहकांना जोडून ठेवावे लागेल. वस्तूविक्रीमागील मार्जिन कमी होत चालले आहे अशावेळी तोटा झाल्यास अन्य व्यापाऱ्यांनी एकमेकांना साथ द्यावी. सध्या ब्रँडिंग आणि ऑनलाईनचे जग आहे. त्यामध्ये टिकण्यासाठी शेतामध्ये गोडावून आणि ऑनलाईन विक्री अशी नवी मॉडेल विकसित करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी करावी. कोरोना काळात व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आपण व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.