निपाणी परिसरात ऊस पीक भरणीची धांदल; रब्बी पिकांची काढणी-मळणीही जोमात!

निपाणी : निपाणी परिसरातील ग्रामीण भागात सध्या उन्हाळी कामांबरोबरच ऊस पीक भरणी व रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी मळणी कामांना जोर आला आहे. त्यामुळे येथील शिवारे गजबजून गेली आहेत. मात्र, वाढत्या उन्हामुळे शेतीचे कामेही सकाळी व सायंकाळी होत आहेत.
खरीप सुगीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून खरीप व रब्बी हंगामानंतर शेतजमिनीत नांगरणी करुन घेण्यात येते. ट्रॅक्टर व बैलजोडी मालकांचा भाव त्यामुळे चांगलाच वधारला आहे. ऊस पीक भरणी कामाला बैलजोडी मालकांकडून एकरी ३५०० रुपये दर आकारला जात आहे. उभ्या ऊस पिकात ट्रॅक्टर जाऊ शकत नसल्याने ऊस भरणी कामासाठी बैलजोडीचाच वापर करावा लागतो. बैलजोडीमुळे उभ्या पिकाचे नुकसान होत नाही. शिवाय जमीन चांगली होते.
वेदगंगा नदीला बारमाही पाण्याची सोय झाल्याने शेतकऱ्याला बऱ्यापैकी लाभ झाला आहे. शेतकऱ्यांनी रब्बीत शाळू, गहू, हरभरा व आंतरपीक म्हणून कांदा आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा पीक वगळता शाळू, गहू, हरभरा पिकाच्या काढणीची कामे जोमाने सुरु झाली आहेत.
सध्या वेदगंगा दुथडी भरून वाहत असल्याने उन्हाळी पीक साधण्याची तयारी चालविली आहे. यामध्ये जनावरांसाठी पावसाळी बेगमी म्हणून कडब्यासह गवत खरेदी सुरु केली आहे. यंदा शाळू पिकाचे उत्पादन अधिक असल्याने कडब्याचे दरही स्थिर असल्याचे सांगण्यात येते.