बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, शरद पवार यांची ग्वाही
येत्या काही दिवसांत राज्याचे सहकार मंत्री, कामगार मंत्री, कामगार संघटकांचे प्रतिनिधी व संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकून साखर उत्पादनात महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. राज्यातील साखर कारखानदारी अनेक आव्हानांना सामोरे जात असतानाही टिकून आहे, वाढत आहे, ही समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी साखर कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
एकेकाळी राज्यात सर्वात मोठा कापड गिरण्यांचा उद्योग होता. गिरणगाव, लालबाग भागात 120 कापड गिरण्या आणि 2 लाख गिरणी कामगार होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागातील संख्या मोठी होती. आज गिरणगावात फक्त एक गिरणी तीही कमी कामगारात सुरू आहे, मात्र साखर उद्योग अनेक आव्हानांना सामोरे जात टिकून आहे, वाढतो आहे, ही समाधानकारक बाब आहे. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये कामगारांच्या दुसऱया पिढीला तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कामगारांना 10-10 महिने पगार मिळत नाही, त्यांनी जगायचे कसे? आकृतीबंधापेक्षा जास्त नोकर भरती करणाऱया संचालक मंडळाबद्दल सहकार खात्याने कडक निर्णय घेण्याची गरज आहे, असेही ते पवार म्हणाले.