महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानला टाकले

महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये यंदाच्या हंगामात देशात सर्वोच्च उत्पादन घेतले असून सिंचन सुविधा वाढतील तसे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. बदलत्या हवामानाचा फार मोठा फटका नगदी पिकांना बसत असल्याने हमखास चलन देणारे पीक म्हणून ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत असून यामुळेच आज महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशांना मागे टाकले आहे. हमखास उत्पन्न मिळणारे पीक म्हणून शेतकरी मोठय़ा प्रमाणात ऊस शेतीकडे वळू लागला असला तरी यंदा लांबत चाललेला गाळप हंगामही न परवडणारा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
चालू वर्षी महाराष्ट्राने ऊस गाळप, साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक मिळवला असून आत्तापर्यंत महाराष्ट्रात ११ कोटी १२ लाख ३४ हजार मेट्रिक टन ऊस गाळप तर ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू वर्षी १०.३८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तर प्रदेश अग्रस्थानी होते. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला होता. हे चित्र चालू वर्षी बदलले असून महाराष्ट्राने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला मागे टाकत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या तुलनेत सुमारे ३५ लाख क्विंटलहून अधिक साखरेचे जादा उत्पादन घेतले आहे. तर राज्यात गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी ५७ लाख ३२ हजार क्विंटल जादा साखरेचे उत्पादन घेतले आहे.
देशपातळीवर या वर्षी ३ केाटी ४७ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १ कोटी २५ लाख मेट्रिक टन राहील. तसेच देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा वाढून तो जवळपास ३९ टक्क्यांवर पोहोचेल. साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र प्रथम तर राज्यात कोल्हापूर विभाग अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे एकूण साखर उत्पादन११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल असून यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्याने २ कोटी ८८ लाख ७९ हजार ७१२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रात साखरेचा सर्वाधिक म्हणजे ११.७५ टक्के उतारा कोल्हापूर विभागात मिळाला आहे. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावरील ९८ तर खासगी तत्त्वावरील ९९ असे एकूण १९७ साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले होते. यामध्ये कोल्हापूर विभागातील ३६ , पुणे विभागातील २९ , सोलापूर विभागातील ४६, अहदनगर विभागातील २७, औरंगाबाद विभागातील २५, नांदेड २७, अमरावती ३ व नागपूर विभागातील ४ अशा साखर कारखान्यांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागामध्ये २ कोटी ४५ लाख ६८ हजार ४५ टन उसाचे गाळप होउन २ कोटी ८८ लाख ७९ हजार ७१२ क्विंटल साखर उत्पादन झाले.
सांगली जिल्हयात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. या तुलनेत साखर कारखान्यांची संख्या कमी आहे असे नाही तर काही कारखाने बंद असल्याने याचा परिणाम अन्य कारखान्यांच्या गाळपावर होत आहे. वसंतदादा साखर कारखान्याने स्थापनेपासूनचा यंदा गाळपाचा विक्रम केला असून या एका कारखान्याने हंगामात १० लाख टन उसाचे गाळप केले आहे. क्रांती, सोनहिरा, उदगीर हे कारखाने अद्याप चालू असून एप्रिलच्या मध्यापर्यंत हे कारखाने सुरूच राहतील असा अंदाज आहे. अजूनही सुमारे २५ हजार हेकटर क्षेत्रातील ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. उसाला तुरे येऊनही गाळपासाठी उत्पादकांना कारखान्याच्या स्लीपबॉयला पायघडय़ा घालाव्या लागत आहेत. तसेच तोडणीसाठी एकरी आठ ते दहा हजाराची रोकड मोजावी लागत आहे. गाळप विलंबाने होत असल्याने साखर उतारा व वजन यामध्येही घट येणार असून याचा फटका उत्पादकांबरोबरच कारखान्यांनाही बसत आहे. अन्य नगदी पिकापासून मिळणारे उत्पन्न हे बदलत्या हवामानामुळे बेभरवशाचे झाले आहे. बाजारकेंद्रित उत्पन्नाची हमी असल्याने माल उत्पादित करूनही बाजारात खपेल, चार पैसे मिळतील याची सुतराम खात्री नसल्याने महाराष्ट्रात सिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या ठिकाणी उसाखालील क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक पाण्याचा वापर करणारे पीक शेतकऱ्यांना चार पैसे देणारे असले तरी याचे पर्यावरणीय स्थितीवर होणारे घातक परिणामही विचार करायला हवेत.