माळेगाव साखर कारखान्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ‘जागरण गोंधळ ’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बारामती : तालुक्यातील माळेगाव सह. साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालकांच्या तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कारखाना कार्यस्थळावर नुकतेच जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप, संदीप गुजर आदींसह बहुसंख्येने ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते. प्रशासनाच्या अनागोंदी व भोंगळ कारभाराविषयी निषेध नोंदविताना अनेक सभासदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

सत्ताधारी संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीचा पहिला हप्ता २८०० रुपये प्रतिटन देऊन तसेच उर्वरित ३३२ रुपये निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून २० मार्चपर्यंत देण्याचे सांगितले. त्यामुळे एफआरपीचे दोन तुकडे करून सभासदांच्या तोंडाला पाने पुसल्याचा अरोप यावेळी करण्यात आला. कारखान्याच्या कामगारांचा पगार वेळेत न होण्यासही कारखाना प्रशासनाला जबाबदार धरून कारखाना कोणत्या दिशेला जात आहे, याबाबत प्रश्नांचा भडिमार आंदोलकांनी केला.

निवडणूक लढण्याची घोषणा

पक्षाने परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या न्याय्य हक्कासाठी युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक लढण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.

या वेळी अॅड. एस. एन. जगताप, गणपतराव देवकाते, अनिल जगताप, राजेंद्र काटे, ज्ञानदेव बुरुंगले, सुशील जगताप, प्रेमजित खलाटे, नितीन तावरे, इंद्रसेन आटोळे, रोहन देवकाते, अमोल कोकरे आदींनी कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. सूत्रसंचालन धनराज निंबाळकर यांनी केले, तर गौरव जाधव यांनी आभार मानले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, संचालक मदननाना देवकाते, तानाजी कोकरे, तानाजी देवकाते, स्वप्नील जगताप, बन्सीलाल आटोळे, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी स्वीकारले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »