मोलॅसेसची टाकी फुटून प्रचंड नुकसान
वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्यातील मोलॅसेसची टाकी फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत आष्टा पोलिस, उत्पादन शुल्क विभागाकडे नोंद करण्यात आली आहे.
हुतात्मा साखर कारखान्यात साठवणुकीसाठी प्रत्येकी साडेचार हजार ९७५ टन क्षमतेच्या तीन टाक्या आहेत. अतिशय भक्कम उभारणी केलेल्या या टाक्या आहेत. त्यातील बी मोलॅसेसच्या तिसऱ्या क्रमांकाच्या टाकीच्या तळातील मुख्य व्हॉल्व्हजवळ अचानक गळती सुरू झाली. टाकी पूर्ण भरलेली असल्यामुळे आणि उष्णतेमुळे मोलॅसेसचा व्हॉल्व्हवर पडलेल्या दाबाच्या परिणामाने मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली.
गळती काढण्यासाठी शंभर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चाळीस तास शर्थीने प्रयत्न केले. घटनास्थळी कारखान्याचे अध्यक्ष वैभवकाका नायकवडी यांच्यासह पदाधिकारी दिवसभर भर उन्हात मदतकार्य करत होते.
आष्टा पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.