व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ
नवी दिल्ली – साखर कारखान्यांच्या डिस्टीलरी, ईथेनॉल प्रकल्पासाठी सुरू असलेल्या व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
८० लाख टन साखर निर्यात करण्याबाबत मंत्री गटाची विशेष बैठक बोलावून निर्णय घेवू, असे आश्वासनही गोयल राज्यातील साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाला दिले.
खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, गोदावरी बायोरिफायनरीचे अध्यक्ष समीर सोमय्या, लोकमंगल ग्रुपचे महेश देशमुख, गंगामाई शुगरचे अध्यक्ष रणजित मुळे, रोहीत नर्हा आदींनी मंगळवारी गोयल यांची भेट घेऊन साखर उद्योगातील समस्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले.
यंदा भारतातील सर्व साखर कारखान्यांकडून किमान ८० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी आणि कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प किंवा डिस्टेलरी उभारणीसाठी घेतलेल्या कर्जावरील, व्याज अनुदान योजनेची मुदत वाढवावी, या प्रमुख दोन मागण्यांसाठी ही भेट घेण्यात आली.