साखर उद्योगाच्या प्रश्नांवर शाश्वत मार्ग काढणे गरजेचे : शरद पवार ; गडकरींचे कौतुक
ऊसाच्या संबंधित अथवा साखरेसंदर्भात कोणताही प्रश्न निर्माण झाला की जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी राहते, ती म्हणजे नितीन गडकरी… असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केले.
पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद 2022 चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी म्हणाले की, साखर उद्योगासमोर असलेले प्रश्न अनेक आहेत, या प्रश्नांवर चर्चा करून विधायक, अनुकूल, शाश्वत आणि पर्यावरण पूरक उपाययोजना हाती घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काळ सुसंगत असे सर्वस्पर्शी व्यापक सूक्ष्मनियोजन महत्वाचे आहे. दूरगामी दृष्टी, दृढनिश्चयी धोरणात्मक संकल्प आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना या त्रिसुत्रीच्या बळावर साखर उद्योगाला चांगली दिशा देण्यासाठी साखर परिषद महत्वाचे योगदान देईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील ऊसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहे, याचा मला मनापासून आनंद आहे, असे शरद पवार म्हणाले.
देशात कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती कमी होत आहे. याचा परिणाम उद्योग आणि शेतीवर होत आहे. ऊसाच्या बगॅसच्या माध्यमातून 3 हजार 600 मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये २४७० मेगावॅट स्थापित क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यापैकी आपण 65 ते 70 टक्के वीज महावितरणला दिली तरी अंदाजे 1660 मेगावॅट वीज राज्य सरकारला मिळू शकते. यासाठी बगॅस आधारीत प्रकल्पाची उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचसोबत सौर ऊर्जेचा उपयोग करणेही आवश्यक आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी भरपूर वाव आहे,मात्र त्यासाठी निधीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन इथेनॉल साठवणूकीची क्षमता वाढविणे आणि त्यासाठी गुंतवणूक, रेल्वेने वाहतूक करण्याची योजना आणि इथेनॉल खरेदी याबाबत तेल कंपन्यांचे धोरण अधिक अनुकूल होण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले.