हुतात्मा चाफेकर यांची जयंती

दामोदर चाफेकर- हुतात्मा, क्रांतिकारक
श्रीधर बाळकृष्ण रानडे- मराठी कवी
गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक- नटवर्य
मृणाल गोरे- ज्येष्ठ समाजवादी नेत्या
गौतम अदानी- भारतातील मोठे उद्योगपती
……………………………………
दामोदर चाफेकर- हुतात्मा, क्रांतिकारक. अत्यंत क्रूर, खूनशी, अत्याचारी इंग्रज अधिकारी रँण्डला यमसदनी धाडणारे क्रांतिकारक (जन्म: २४/२५ (विवाद्य)जून १८६९; शहीदः १८ एप्रिल १८९८)
पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हौदोस घातला. इंग्रजांविरूद्धात असंतोष पसरू लागला. रँड हा अत्यंत क्रुर, खुनशी इंग्रज अधिकारी पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. दामोदरपंतांनी रँडचा वध करण्याची योजना आखली. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांना वधकर्त्यांची नावे कळाली व त्यांनी दमोदरपंतांना पकडले. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चापेककर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले.
चाफेकर हे मूळचे कोकण प्रांतातील वेळणेश्वर गावचे राहणारे होते. त्यांच्या घराण्याची एक शाखा पुण्याजवळ चिंचवड येथे स्थायिक झाली. विनायकराव चाफेकर यांनी तेथे मोठी मान्यता मिळवली. त्यांच्या मुलाचे नाव हरी होते. हरीचा गळा होता व पाठांतर चांगले होते. तो लहान वयात कीर्तने करू लागला.
लवकरच हरीपंतांची चांगल्या कीर्तनकारांत गणना होऊ लागली. ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांना दोन मुली व तीन मुलगे अशी अपत्ये होती. मुलांमध्ये सर्वात मोठा दामोदर होता. बाळकृष्ण यांचा १८७३ साली व वासुदेव यांचा १८७९ साली जन्म झाला.
तिन्ही मुले बुद्धिमान व पाणीदार होती. ती आपल्या वडिलांना कीर्तनात साथ देत असत. ‘दास्यभाव रुजवणारे हे इंग्रजी शिक्षण मला नको,’ असे म्हणून दामोदराने दुसरीतून इंग्रजी शाळा सोडली. आधी वडिलांबरोबर व मग स्वतंत्रपणे तो कीर्तन करू लागला.
हरिपंतांकडे ‘केसरी’ येत असे. आसपासच्या घरांतील अनेक मंडळी एकत्र जमून नित्यनेमाने केसरीचे वाचन करीत असत. दामोदर श्रोत्यांमध्ये सर्वांत पुढे बसे. वाचनानंतर होणार्याे चर्चेत तो आवेशाने भाग घेई. कोल्हापूरच्या राजाच्या छळाच्या गोष्टी वाचून त्याला फार वेदना होत असत. ‘कोणीतरी यांना चांगली शिक्षा केली पाहिजे.’ असे तो वारंवार म्हणत असे. १७ जुलै १८८२ रोजी टिळक आणि आगरकर यांना बर्वे प्रकरणावरून चार महिन्यांची शिक्षा झाली. तो समाचार ऐकून दामोदर धाय मोकलून रडला. तो त्या दिवशी जेवला नाही. त्याची आई म्हणाली, ‘दामू टिळकांनी रडायला शिकवले नाही. त्यांनी लढायला शिकवले.’
मग दामोदर आपली नेहमीची कामे करू लागला. पण टिळक तुरूंगातून सुटून येईपर्यंत तो एक वेळच जेवत होता. टिळक आणि आगरकर सुटले त्या दिवशी तो तुरुंगाच्या फाटकावर गेला. त्यांना पाहून तो आनंदाने नाचला. त्याने टिळकांचा जयजयकार केला. टिळकांच्या चरणाची धूळ त्याने मस्तकी लावली.
दामोदरपंत व त्याचे समवयस्क नवतरूण रोज दूर फिरायला जात असत. आसपासच्या किल्ल्यांवरही ते जात असत. एखाद्या शिलाखंडावर बसून ते भारताच्या भविष्याविषयी चर्चा करीत असत. त्यांनी ‘राष्ट्रहितेच्छू मंडळांची’ स्थापना केली. बलाच्या उपासनेशिवाय देशाला तरणोपाय नाही हे जाणून त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या. तलवार चालविणे, भाला फेकणे, गोफणीने दगड मारणे अशा गोष्टींचा ते अभ्यास करू लागले. त्यांच्यापैकी प्रत्येकजण रोज पाचशे दंड व हजार बैठका इतका व्यायाम करीत असे. फुलाने कितीही नको म्हटले तरी भुंगे त्याच्याभोवती रंजी घालणारच. दामोदरच्या बोलण्या-चालण्यात तसेच आकर्षण होते. त्याने निवडक तीस-चाळीसजणांशी विशेष संबंध ठेवला. सर्वजण या समूहाला चाफेकर मंडळ म्हणून ओळखू लागले. ‘ठोऽ ठोऽ ठोऽ’ असा रिव्हाल्वरच्या गोळ्यांचा आवाज दणाणला. आयर्स्टच्या डोक्याला त्या गोळ्या भेदून गेल्या. ‘मला मारले’, एवढे शब्द त्याने कसेबसे उच्चारले.
आयर्स्टबाई गांगरल्या. काय झाले ते प्रथम त्यांना कळलेच नाही. ‘काय मूर्ख आहेत हे काळे लोक! खुशाल रस्त्यावर फटाके फोडत आहेत, असे त्या म्हणाल्या. फटाक्यांच्या आवाजाने त्यांच्या टांग्याचा घोडा बुजत होता. तेवढ्यात मागे टांग्यातच आवाज आला. ‘मूर्खांनी टांग्यावर फटाके टाकलेत की काय?’ असे त्या म्हणतात, तोच आयर्स्टचा देह त्यांच्या अंगावर कोसळला. आयर्स्टच्या डोक्यातून भळभळ रक्त वाहात होते. त्या मोठ्याने किंचाळल्या, ‘वाचवा, वाचवा! भयानक प्रकार! अरे, गाडी थांबव.’
टांगेवाल्याला बाईंचे म्हणणे कळले नाही. फटाके पाहून बाई हर्ष प्रगट करीत असतील असे त्याला वाटले. टांगा घडघडा पुढे चालला होता. घोडा आवरेनासा झाला होता. मागाहून दोन टांगे भरधाव येत होते.
थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशार्यााचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला. दामोदरपंतांनी झटकन खाली उडी मारली. विजेच्या चपळाईने ते झाडीत दिसेनासे झाले. अंधार, फटाक्यांचा आवाज आणि लोकांचा कोलाहल यामुळे टांग्यात काय घडले हे, टांगेवाल्याला कळलेच नाही. तो ऐटीत साहेबांचा टांगा हाकत होता.
पुढे आयर्स्टची गाडी भरधाव धावत होती. आयर्स्टबाई रडत ओरडत होत्या. त्यांच्या मागील टांग्यात लुईस आणि सार्जंट होते. बाईंचे ओरडणे ऐकून त्यांनी आपल्या गाडीतून उड्या मारल्या. धावत जाऊन त्यांनी पुढचा टांगा थांबवला. आयर्स्ट पती पत्नी खूप जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मागे त्यांना एक टांगा येताना दिसला. त्यात डॉक्टर असतील अशा कल्पनेने त्यांनी तो थांबवला. त्यांनी आत डोकावून म्हटले, ‘डॉक्टर लवकर चला. आयर्स्टसाहेब जखमी झाले आहेत. लवकर चला.’ पण, हे काय? टांग्यातील माणसाने काहीही उत्तर दिले नाही. त्याने कोणतीही हालचाल केली नाही. त्यांनी टांगेवाल्याला विचारले, ‘काय रे, टांग्यात कोण साहेब आहेत?’
टांगेवाला म्हणाला, ‘रँडसाहेब!’ लुईस आणि सार्जंट टांग्यात चढले. पाहतात तो रँडसाहेब घायाळ झालेले असून जवळजवळ बेशुद्ध होऊन पडले होते. सगळा टांगा रक्ताने भरला होता. दोन्ही गाड्या ससून हॉस्पिटलकडे नेण्यात आल्या. आयर्स्ट आधीच मेला होता. रँडसाहेब दुसर्याा दिवशी पहाटे थोडे शुद्धीवर आले. ते थोडेसे बोलले, पण ती सगळी असंबद्ध बडबड होती. त्यांना भयंकर वेदना होत होत्या. लोक म्हणत होते, हजारो लोकांना त्याने छळले, नाडले, पीडले आणि मारले, त्याचे फळ त्याला मिळाले. तीन जुलैच्या रात्री त्याचा अंत झाला. सगळ्या पुण्याला ‘त्राहि भगवान्’ करून सोडणारा जुलमी अधिकारी मेला. रँड आणि आयर्स्ट यांना मारल्यानंतर तिघेही चाफेकर बंधू, रानडे आणि आपटे जवळच्याच शेतामध्ये शिरले. दामोदरपंत आणि बाळकृष्णपंत कालव्याच्या बाजूने चालत गेले आणि मग फर्ग्युसन कॉलेजकडून गावात शिरले. वासुदेवराव चाफेकर, रानडे आणि आपटे हे तिघेजण, आपण जसे काही त्या गावचेच नाही अशा थाटात राजरस्त्याने घरी परत आले.
दोन दिवसांनी चाफेकर बंधूंनी पुणे सोडले. लवकरच दामोदरपंत मुंबईला नित्याप्रमाणे किर्तने करू लागले. पुण्याच्या वार्ता मुंबईला येई लागल्या. टिळकांना पकडले, नातूबंधूंना पकडले, अनेकांचा अनन्वित छळ करण्यात येत आहे, इत्यादी गोष्टी दामोदरपंतांच्या कानावर येत गेल्या. त्यांचे अंतःकरण विदीर्ण झाले. त्यांचे मन द्विधा झाले. दूर देशात पळून जावे, की रँडला मारले असे उघडपणे सांगून पकडवून घ्यावे? त्यांनी बाळकृष्ण व वासुदेव यांना अज्ञात स्थळी निघून जाण्यास सांगितले. आपल्या घराभोवती गुप्तचर फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. ३० सप्टेंबर १८९७ रोजी त्यांना पकडण्यात आले. सर्व प्रकारचे प्रयोग त्यांच्यावर करण्यात आले, पण सगळे मी केले. माझा साथीदार कोणीही नाही. असे ते पुनःपुनः सांगत राहिले. शस्त्रे कशी मिळवली, कशी दडवली, कोणत्या शस्त्रांनी मारले वगैरे सगळे त्यांनी सांगितले. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. साक्षी, पुरावे, युक्तिवाद इत्यादी गोष्टी झाल्या. द्रवीड बंधूंनी चाफेकरांविरुद्ध अनेक महत्त्वाच्या घटना सांगितल्या. न्यायाधीश क्रो याने दामोदरपंतास फाशीची शिक्षा ठोठावली. ते ऐकून दामोदरपंत निभर्यपण म्हणाले, ‘बस, फाशीच फक्त? आणखी काही घोर शिक्षा असेल तर द्या ना.’ प्रकरण वरिष्ठ न्यायालयापुढे गेले. त्याने फाशीचाच निर्णय दिला. चाफेकर बंधुंच्यावर २२ जून १८९७ हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. चाफेकर बंधुंना पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली.
……………………………………
श्रीधर बाळकृष्ण रानडे- मराठी कवी. रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक (जन्मः २४ जून १८९२, नागपूर; निधनः २१ मार्च १९८४)
मुंबई विद्यापीठाचे बी. ए. व एम्. एस्सी. व्यावसायाने प्राध्यापक. रानडे ह्यांच्या पत्नी मनोरमाबाई रानडे (१८९६– १९२६) ह्याही रविकिरण मंडळात होत्या. दोघांनीही आपली काव्यरचना १९१२ च्या आसपास सुरू केली होती.
श्रीधर बाळकृष्ण रानडे ह्यांचे काळाच्या दाढेतून हे खंडकाव्य १९१५ साली प्रसिद्ध झाले. ते कॉलऱ्याने आजारी असताना त्यांच्या बालपणापासूनच्या अनेक आठवणी, स्वप्ने त्यांच्या डोळ्यांसमोरून गेली. आपण मरण पावलो असून देहातीत अवस्थेत गेल्याचे भासही त्यांना झाले. त्यांच्या ह्या सर्व मनःस्थितीचे दर्शन त्यांच्या ह्या खंडकाव्यातून घडते. मृत्यूच्या दारात जाऊन परत आल्यासारखा अनुभव ह्या आजारात त्यांनी घेतला होता.
त्यांची स्फुट कविता पाऊणशेच्या आसपास आहे आणि ती श्री -मनोरमा (१९३९) ह्या संग्रहात अंतर्भूत आहे. त्यांच्या व मनोरमाबाईंच्या कवितांचा हा संग्रह असून त्यात मनोरमाबाईंच्या ९२ कविताही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मनोरमाबाईंच्या काव्यरचनेत आत्मलेखनपर कविता सर्वाधिक आहे.
श्रीधर बाळकृष्ण रानडे आणि मनोरमाबाई रानडे हे दांपत्य रविकिरण मंडळाच्या काव्यात्म जीवनाचे अधिष्ठान होते. ‘माधुकरी’, ‘लेजीम’ असा श्रीधर बाळकृष्ण रानडे ह्यांच्या कविता लक्षणीय ठरल्या तरी त्यांनी पुढे मुख्यतः काव्यरसिकाची भूमिका घेतली. महाराष्ट्र रसवंती (भाग १ ते ३ १९३५-३६) ह्या अर्वाचीन कवितांच्या संग्रहांचे तसेच मराठी गद्यवैभव (भाग १ ते ३ १९३५-३६) ह्या पुस्तकांचे संपादन त्यांनी गं. दे. खानोलकर ह्यांच्यासह केले. मराठी साहित्यपरिचयाच्या हेतूने त्यांनी नवयुग वाचनमाला (१९३६ –३८) (पुस्तक पाचवे, सहावे, सातवे भाग अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा) संपादिली. दिवाळीची डाली (१९३८ – प्रहसन), कुंपणावरून (१९४७-छायानाट्य) असे नाट्यलेखनही त्यांनी केले आहे. तिंबूनानांचा रेडिओ (१९४४) ह्या त्यांच्या पुस्तकात रेडिओवरील गोष्टी-गाणी ह्यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमाचे लेखन समाविष्ट आहे. पुणे येथे ते निधन पावले. (अ. र. कुलकर्णी)
……………………………………
गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक- मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य (जन्मः २४ जून १८९९; निधनः ८ एप्रिल १९७४)
मराठी रंगभूमीवर फार थोड्या नटांना खलनायकांच्या भूमिका करून यश, कीर्ती आणि संपत्ती यांचा लाभ झाला. अशा थोड्या नटांत नानासाहेबांची गणना प्रामुख्याने होते. जाहिरातीत नटवर्य नानासाहेब फाटक हे नाव वाचले की, प्रेक्षक नाट्यगृहात तोबा गर्दी करीत असत. धिप्पाड आणि बांधेसूद तसेच रेखीव आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व. रंगमंचावर पाऊल टाकले की, सारा रंगमंच भरून गेला असे वाटत असे. देहयष्टी दृष्ट लागण्यासारखी. नटाला जो ‘डोळा’ लागतो तो नानासाहेबांपाशी होता. आवाज तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा. हालचाली कमालीच्या ग्रेसफुल. आवाज पल्लेदार असल्याने कितीही मोठे वाक्य ते अगदी विनासायास, सहजगत्या आणि लीलया फेकीत. त्यांनी केलेल्या सर्व भूमिका ही कुणाचीही नक्कल न करता स्वत:च्या पद्धतीने, विचारपूर्वक केल्या होत्या. नटाने जीवनातील विविध अनुभव घ्यावेत. अनेक गोष्टी पाहाव्यात, कराव्यात, भोगाव्यात असे त्यांचे मत होते. त्यांना वाटे की, अनुभवाने समृद्ध असे जीवन जर नटाचे नसेल तर त्याला विविध भूमिकांचा आविष्कार उत्तम प्रकारे करता येणार नाही. विद्यार्थीदशेतली नानासाहेबांची काकासाहेब खाडिलकरांच्या ‘सत्त्वपरीक्षा’ या नाटकातली विश्वारमित्राची भूमिका खूप गाजली, पण त्यांना खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली ती ‘रक्षाबंधन’ या नाटकातील ‘गिरीधर’च्या भूमिकेने. या भूमिकेने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. हा सुशिक्षित आणि देखणा नट आपल्याकडे असावा असे गुणग्राहक केशवराव भोसल्यांना वाटले आणि त्यांनी नानासाहेबांना ललितकलेत बोलावले. या नाटक मंडळीत नानासाहेबांचा प्रवेश झाला आणि त्यांच्यातील नाट्यगुणांना वाव मिळेल अशा विविधांगी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत. केंद्र सरकारने सर्वश्रेष्ठ नट म्हणून नानासाहेबांना गौरवचिन्ह अर्पण केले होते. त्यांच्याइतका भव्य, रुबाबदार, देखणा आणि ग्रेसफुल नट आजतागायत दुसरा कुणी झाला नाही. (संदर्भ- शुभदा दादरकर / सामना)
……………………………………
मृणाल गोरे- ज्येष्ठ समाजवादी नेत्या. (जन्म: २४ जून १९२८; निधन १७ जुलै २०१२)
या पूर्वाश्रमीच्या मृणाल मोहिले. पिण्याचे पाणी आणि महागाईच्या प्रश्नावरून आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडल्याने सामान्य जनतेत पाणीवाली बाई’ आणि
लाटणेवाली बाई’ अशी झुंजार ओळख निर्माण केलेल्या मृणाल गोरे यांच्यावर त्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते साने गुरुजी, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाऊसाहेब रानडे यांचा प्रभाव पडला. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तमरीत्या पास होऊनही त्यांनी आपले शिक्षण थांबवून समाजकार्यात उतरण्याचा आपला मनोदय वडिलांसमोर जाहीर केला. त्यांचा हा निर्णय प्रचंड धक्कादायक होता. आंदोलन कार्यात असताना त्यांचा केशव गोरे ऊर्फ बंडू गोरे यांच्याशी परिचय होऊन १९४८ च्या सुमारास विवाह झाला. विवाहानंतर गोरेगावातील टोपीवाला बंगला हे त्यांचे निवासस्थान बनले. परंतु दुर्दैव असे की विवाहानंतर दहा वर्षांच्या आतच बंडू गोरे यांचे निधन झाले. त्यांच्या नितधनानंतर त्यांनी केशव गोरे स्मारक ट्रस्टची स्थापना केली.
झुंजार सामाजिक कार्यकर्त्या अशी मृणालताईंची ओळख होती. गर्भलिंग निदान चाचणीच्या विरोधातही त्यांनी वारंवार आंदोलने केली. राष्ट्रसेवादलासाठी त्यांनी वाहून घेतले होते. आणिबाणीविरोधात त्या आधी भूमिगत होऊन काम करत होत्या, नंतर त्यांना तुरूंगवासही झाला. १९७७ मध्ये जनता पार्टीच्या तिकिटावर त्या खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी स्त्री अत्याचारविरोधात प्रत्येक वेळी आवाज उठवला. काही वेळा तर प्रस्थापित प्रथेविरोधातही त्यांनी दोन हात केले. राजस्थानातील रूपकंवर सती प्रकरण, शाहबानो प्रकरण इत्यादी समाजविघातक प्रथेविरोधात त्यांनी महिलांना मोठया प्रमाणावर एकत्र करून आवाज उठवला. ठिकठिकाणी निदर्शने केली. समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. आयुष्याच्या उत्तरार्धात गोरेगाव हीच त्यांची कर्मभूमी ठरली. अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. गरीबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी मृणालताईंनी गोरेगाव येथे नागरी निवारा परिषदेची स्थापना केली. त्याठिकाणी त्यांनी ६ हजार लोकांना घरे मिळवून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मुंबईमधून त्यांचा पराभव झाला, तेव्हा यांचा प्रत्यय त्यांना आला. त्या पराभवाचे त्यांना खूपच वाईट वाटले. ज्या जनतेसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले, सातत्याने परिसरातील कामांनाच प्राधान्य दिले त्याच जनतेने हिंदुत्ववाद्यांना साथ दिली, याची सल त्यांच्या मनात सतत राहिली. त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. या सर्व गोष्टींचे विस्तृत विवेचन या पुस्तकात वाचावयास मिळते. गरिबांसाठी त्यांनी स्वस्त किमतीमध्ये घरे बांधून शासनासमोर आणि संपूर्ण देशासमोर नवा आदर्श निर्माण केला. ‘सिमेंट घोटाळा’ ‘एन्रॉन प्रकल्प’ या विरोधात त्यांनी आवाज उठवला. शासनातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. Footprints pf a crusader या पुस्तकात मृणाल गोरे यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट रोहिणी गवाणकर यांनी मांडला आहे. चरित्रकार स्वत: मृणाल गोरे यांची लहानपणापासूनची मैत्रीण असल्यामुळे मृणाल गोरे यांच्या जीवनातील बारीक तपशीलही खुबीने मांडले आहेत.
……………………………………
गौतम अदानी-

उद्योगपती यांचा आज वाढदिवस (जन्म: २४ जून १९६२)
‘फोर्ब्स’नुसार, देशातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत ११ व्या क्रमांकवर असलेले गुजरातचे उद्योगपती गौतम अदानी गर्भश्रीमंत उद्योजक आहेत. कोळशाच्या खाणी, विद्युत निर्मिती, लॉजिस्टिक्स, रियल एस्टेट, एग्रो प्रॉडक्ट्स, ऑइल व गॅस सारख्या क्षेत्रात त्यांच्या कंपन्या आहेत. अदानींच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर ३०,००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. गौतम अडाणी, संस्थापक आणि अध्यक्ष अदानी समूह जो भारतातील सध्याचा आघाडीच्या उद्योगांपैकी एक गणला जातो. इतर अनेक उद्योजकांप्रमाणे अडाणी यांना त्यांच्या शक्ती आणि स्थान वारश्यातून मिळालेले नाही. परंपरागत गुजराती-जैन कुटुंबातून आलेल्या गौतम यांच्या रक्तातच ते ‘धंद्याचे’ कौशल्य आहे ज्याचे इतरांना अनुकरण करावेसे वाटते. त्यांचे माता-पिता शांताबेन आणि शांतीलाल अदानी यांनी उत्तर गुजरातच्या थारद या छोट्याश्या गावातून अहमदाबाद येथे स्थलांतर केले ते आठ मुलांच्या उज्वल भवितव्यासाठीच.
गौतम अदानी यांनी आपले शालेय शिक्षण शेठ सीएन विद्यालय अहमदाबाद येथून पूर्ण केले आणि नंतर त्यांनी स्वत:च गुजरात विद्यापीठातून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. बीकॉम करत असताना अकाउन्टस आणि बँकिंग विषयात ते फार काळ रमले नाही. त्यावेळी त्यांच्या लक्षात येऊ लागले की हा काही त्यांच्यासाठीचा विषय नाही. त्यापेक्षा आपला वेळ चांगल्या आणि मोठ्या कामी यावा असे त्यांना वाटू लागले. त्याचवेळी दुस-या वर्षात असताना अदानी यांना धक्का बसला त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आणि केवळ खिशात शंभर रुपये घेऊन त्यांनी मुंबईची स्वप्ननगरी गाठली. त्यांच्या नशीबाची गाठ त्यांच्या महिंद्रा बंधू यांच्याकडील पहिल्याच नोकरीत पडली. व्यवसायाचे ‘A’ टू ‘Z’ पर्यंतचे बारकावे शिकून घेत असतानाच त्यांनी त्याचवेळी बदलत्या बाजाराच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. झवेरी बाजारात त्यांनी मग स्वत:चा हि-याच्या दलालीचा उद्योग सुरु केला. पहिल्याच वर्षी त्यांनी लाखोंची कमाई केली. त्यांच्या आयुष्यातील ही पहिली यशाची मोठी झेप होती.
वर्षभरानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधु महासुख अदानी यांनी अहमदाबाद मध्ये प्लास्टिक उद्योग सुरू केला आणि त्यांना विनंती केली की घरी परत येऊन त्यात लक्ष घालावे. गौतम यांच्या जीवनात हाच ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. पॉलिव्हिनल क्लोराईड औद्योगिक जगतातील महत्वाचा कच्चा माल आयात करण्याचा त्यांचा निर्णय महत्वाचा ठरला. त्याने त्यांच्या जागतिक बाजारातील धाडसाची प्रचिती दिली.
जागतिक आर्थिक उदारीकरण गौतम यांच्यासाठी वरदानच ठरले. ज्या स्थितीचा फायदा त्यांना बाजारात झाला. त्यांनी १९८८मध्ये अदानी समूहाची स्थापना केली. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत झटपट बहुराष्ट्रीय व्यापारी पेढ्यांचे महामंडळ बनलेल्या या समुहाने आधी शेती आणि ऊर्जा या क्षेत्रात जम बसविला. १९९१च्या सुमारास कंपनीने स्त्रोत आणि शक्ती यांच्यात चांगली वृध्दी केली. गौतम यांना विश्वास होता की हीच वेळ कंपनीचा विस्तार आणि वाढीसाठी योग्य होती. त्यानंतर अदानी समुहाने विस्तारीत उर्जाक्षेत्र आणि वाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्याचबरोबर वीज निर्मिती आणि पारेषणासहीत,कोळसा व्यापार उत्खनन वाहतूक, नैसर्गिक वायुवहन, तेल आणि वायु उत्खनन त्याच बरोबर बंदरेविकास आणि विशेष आर्थिक क्षेत्र. असंख्य लक्षावधी डॉलर्सच्या या गुंतवणूकीसोबतच या उद्योगांच्या मालकाने या क्षेत्रांचे नेतृत्व केले पण गौतम यांनी आपल्या पूर्वीच्या दयनिय स्थितीला लक्षात ठेवले. अशा प्रकारे सारे काही समाजाला परत देण्याचे त्यांनी ठरविले तेच त्यांच्या पत्नी प्रीती अदानी यांच्यासोबत, ज्या दंतवैद्य आहेत आणि अडाणी समुहाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त देखील आहेत. अदानी समुह अनेक वैचारिक बांधिलकी असलेल्या संस्था आणि शिक्षण, सामाजिक आरोग्य, यथायोग्य जीवनमान विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधा विकासातील संस्थांशी जोडल्या गेल्या आहे. त्यांचा दृष्टीकोन आहे की, “ समाजाच्या विकासाच्या टप्प्यावरील अडथळ्यांना दूर करण्याची बांधिलकी, त्याचसाठी परिपूर्णतेने स्वयंसिध्द विकासाचा प्रयत्न करणे, त्यातूनच जीवनमान उंचाविणे”
गौतम यांचा विकासांच्या कामातही सरकार सोबत न्यायाचा झगडा झाला आहे. त्यांच्या काही जमिनीच्या व्यवहारातून वादंग निर्माण झाले आहेत ज्यांची योग्यपणाने मंजूरी झाली नाही. त्याचबरोबर अनेक उद्योगांच्या प्रकल्पांना राज्य सरकारी पर्यावरण विभागाच्या परवानग्या नसल्याने उच्च न्यायालयात दावे दाखल झाले आहेत.
असे असले तरी गौतम यांनी त्यांच्या उंचीने या सा-यांचा मुकाबला केला आहे. “ सरकारसोबत व्यवहार म्हणजे तुम्हाला लाचच द्यावी लागेल असे काही नाही”, असे त्यांना अनेक कार्यक्रमात बोलताना ऐकले असेल. हे सारे असले तरी गौतम यांनी सज्जन जिंदल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जेडब्ल्यु स्टिल यांना सोबत घेऊन उडपी येथे सहा हजार कोटी रुपयांच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी यशस्वीपणे पाऊल टाकले आहे. अशी वदंता आहे की, गौतम यांनी हा कठीणातील कठीण सौदा केवळ दोन दिवसांत निश्चित केला! ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी!
(संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)