100% इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बाईक लवकरच : नितीन गडकरी
नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कार आणि दुचाकी लवकरच भारतीय रस्त्यावर दिसायला लागतील. कारण अनेक भारतीय कंपन्या 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार आणि दुचाकींचे उत्पादन करण्यासाठी प्रकल्प उभारत आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
अलीकडेच, टोयोटाने 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे फ्लेक्स कार तयार करण्यासाठी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. गडकरी म्हणाले की, टाटा आणि सुझुकीही 100 टक्के इथेनॉल किंवा फ्लेक्स इंजिन कारच्या निर्मितीवर काम करत आहेत. टू-व्हीलर सेगमेंटमध्ये बजाज, टीव्हीएस आणि हिरो फ्लेक्स-इंजिन बाइक्स आणि स्कूटर बनवत आहेत.
टोयोटाने तयार केलेल्या अशाच वाहनातून गडकरी संसदेत आले आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “फ्लेक्स इंजिन असलेले आणि युरो 6 च्या उत्सर्जन नियमांचे पालन करणारे हे जगातील पहिले वाहन आहे. ते निव्वळ शून्य उत्सर्जन देते. उसाचा रस, मोलॅसिस आणि कॉर्न पासून बनवलेल्या इथेनॉलवर चालते..”
“इतर उत्पादकही फ्लेक्स इंजिन आणण्यावर काम करत आहेत. पेट्रोल पंपाप्रमाणेच आता आमच्या शेतकऱ्यांकडे इथेनॉल पंप असतील. आमची १६ लाख कोटी रुपयांची आयात आहे. त्यात मोठी बचत होईल. अशा वाहनांमुळे प्रदूषण कमी होईल, खर्च वाचेल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. ही वाहने 100% इथेनॉलवर चालतील…”, असे गडकरी म्हणाले.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये, नितीन गडकरी यांनी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने विकसित केलेल्या १०० टक्के इथेनॉल-चलित भारत स्टेज (BS)-VI-अनुरूप इलेक्ट्रिक फ्लेक्स-इंधन कारच्या प्रोटोटाइपचे अनावरण केले होते. आता या प्रोटोटाइप कारचे टोयोटा व्यावसायिक पातळीवर उत्पादन सुरू करणार आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे प्रकल्प उभारण्याची घोषणा टोयोटाने नुकतीच केली आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये अनावरण केलेली प्रोटोटाइप कार, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या मॉडेलची 100 टक्के इथेनॉल (E100) आधारित कार होती. ती तिचे ४० टक्के अंतर इथेनॉलवर आणि उर्वरित ६० टक्के अंतर इलेक्ट्रिकवर, पेट्रोल इंजिन बंद करून कापू शकते.
याआधीही फ्लेक्स-इंधन वाहने आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केली गेली आहेत आणि टोयोटाने 2022 मध्ये आपल्या कोरोलाची फ्लेक्स-इंधन आवृत्ती लाँच केली होती. आता भारत भारताच्या BS-VI उत्सर्जन मानकांचे पालन करणारी फ्लेक्स-इंधन वाहने तयार करण्यास तयार आहे.
गडकरी म्हणाले, “इथेनॉल उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, इथेनॉलची मागणी वाढून भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला आकार देत आहे.”
“फ्लेक्स कार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील. इथेनॉल स्वदेशी आहे आणि त्याचे सर्व फायदे शेतकरी घेतील. पेट्रोल पंपाप्रमाणे इथेनॉल पंपही असतील,” असे गडकरी पुढे म्हणाले.