१५२ कारखान्यांकडूनच शंभर टक्के एफआरपी अदा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : गतवर्षीचा साखर हंगाम संपला असला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली असून,  राज्यातील तब्बल १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात २०० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये ८५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्या उसाची २४ हजार ७२० कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडे ३३.२६ कोटींची एफआरपी थकित

दरम्यान, यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख जाहीर झाली असली तरी व आरआरसी कारवाई होऊन देखील सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांकडे अद्याप ३३.२६ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. यामध्ये सिद्धेश्वर, सिद्धनाथ, गोकूळ शुगर्स , मातोश्री, तर जयहिंद या कारखान्यांचा समावेश आहे. दिवाळी सण काही दिवसांवर येवून ठेपला असताना अद्याप थकित एफआरपी न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.  साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, गोकूळ शुगर, मातोश्री व जयहिंद या पाच कारखान्यांकडे सप्टेंबरअखेर ३३.२६ कोटी रुपये एफआरपी थकीत असल्याचे दिसून येत आहे. यापैकी सिद्धनाथ, गोकूळ शुगर, मातोश्री व जयहिंद या कारखान्यांवर २५ मार्चला तर सिद्धेश्वर कारखान्यावर २५ एप्रिलला आरआरसी कारवाई झाली आहे. त्यानंतरही या कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

२८ कारखान्यांचे गाळप परवान्यासाठी अर्ज

यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गाळप परवाना मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १ ते ३० सप्टेंबर अशी होती. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील २८ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी साखर आयुक्तालयाकडे अर्ज दाखल केले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »