शॉर्टसर्किटमुळे बीड जिल्ह्यात १२ एकर ऊस जळून खाक

बीड : मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. या घटना रोखण्यात मात्र महावितरण असो वा स्थानिक प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याचे बोलले जात आहे. अशीच पुन्हा एका भीषण आगीची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील आडगाव येथे शनिवारी रात्री घडली आहे. यात दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आडगाव येथील शेतकरी अंकुश जामकर आणि भिमराव जामकर यांच्या शेतातील तब्बल १२ एकर उसाचे पीक पूर्णतः शॉर्टसर्किटमुळेच जळून खाक झाल्याचे प्राथमिक तपासानुसार कळते. या घटनेमुळे दोन्ही शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऊसाचे पीक काही दिवसांत कारखान्यात गाळपासाठी पाठवायचे होते; मात्र मेहनतीने वाढवलेले पीक डोळ्यांसमोर भस्मसात झाले. आगीच्या ज्वाळा इतक्या प्रचंड होत्या की शेतकरी व ग्रामस्थांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र, काहीही उपयोग झाला नाही. घटनेची माहिती समजताच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्यासह शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दादासाहेब सोनवणे, युवा नेते चांद भाई पठाण, सिद्धेश्वर गव्हाणे, कुंडलिक जामकर आदींनी थेट बांधावर धाव घेतली आणि आगीमुळे उद्धस्त झालेल्या उसाच्या फडाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत तहसीलदार व एमईसीवी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






