१३ सहकारी साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना कर्जरुपी दिलासा दिला आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील सहकारी साखर कारखान्यांना १ हजार ८९८ कोटींचा कर्जरुपात बुस्टर डोस दिला आहे.

१३ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम विभागाकडून हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. आठ वर्षांच्या मुदतीने हे कर्ज देण्यात आले असून, त्याची वेळेत परतफेड न केल्यास दोन टक्के अतिरिक्त दंडही आकारण्यात येणार आहे.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील साखर कारखान्यांच्या प्रतिनीधींकडून सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. यामध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला समर्थन करणाऱ्या १३ साखर कारखान्यांची समितीने निवड केली.

भाजपचे ५ राष्ट्रवादीचे ७ आणि एक काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) ८० कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. राज्यातील आणखी सहकारी साखर कारखान्यांना देखील सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षा आहे, परंतु यांना सरकार दिलासा देणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाराष्ट्र शासन आणि प्रादेशिक संचालनालय पुणे यांना ज्या कारखान्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. त्याचा योग्य वापर होतो की नाही, याबाबत लक्ष ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच, या कर्जाचा वापर पगार किंवा संचालकांना मानधनासाठी करू नये, अशा सूचनाही केल्या आहेत.

या कारखान्यांना मंजूर झाले कर्ज

  • श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि. वारणानगर, कोल्हापूर – ३५० कोटी
  • राजगड सहकारी साखर कारखाना लि., अनंतनगर निगडे, पुणे – ८० कोटी
  • अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि., अंबासाखर, बीड ८० कोटी
  • अगस्ती सहकारी साखर कारखाना लि., अगस्तीनगर, अहमदनगर – १०० कोटी
  • सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, अहमदनगर – १२५,००
  • लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि., सुंदरनगर, बीड – १०४ कोटी
  • श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि., मंगळवेढा, सोलापूर – १०० कोटी
  • श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि., आदिनाथनगर, अहमदनगर ९९ कोटी
  • लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि. नेवासा, अहमदनगर – १५० कोटी
  • किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुईज, सातारा – ३५० कोटी
  • किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग लि., खंडाळा, सातारा – १५० कोटी
  • श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि. धाराशिव – १०० कोटी
  • सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर फॅक्टरी लि., श्रीगोंदा, अहमदनगर – ११० कोटी
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »