‘श्रीनाथ’च्या सभासदांना १५% लाभांश, माफक दरात साखर
पुणे – श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सभासदांना वर्ष 2023-24 करिता 15 टक्के लाभांश देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी जाहीर केले आणि दिवाळीपूर्वीच लाभांश वितरण करण्यात आले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माफक दरात साखर वितरण सुरू करण्यात आले आहे.
दिवाळीकरिता माफक दरात साखर वाटप केली जाते. साखरेचे वितरण हे शेअर्सच्या रकमेनुसार तसेच हंगाम 2023-24 मध्ये गाळपास आलेल्या उसाच्या प्रमाणानुसार, अशा दोन्ही पद्धतीने साखर दिली जात आहे.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी यांना येत्या दिवाळी करिता कारखाना कार्यक्षेत्रातील गट ऑफिसमध्ये दि. 14 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रति किलो 20 रुपये या दराने साखर वाटप करण्यात येत आहे.
साखर वितरण व्यवस्था कारखाना कार्यक्षेत्रातील राहू, पारगाव (पारगाव, रांजणगाव गटाची) खामगांव, अष्टापूर फाटा (हवेली व खेड गेटकेन गटाची), तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर या शेतकी गट ऑफिसेसमध्ये सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे कारखान्याचे साखरेचे वाटप 10, 20, 50 किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यक्षेत्रातील उसाचे उत्पादन लक्षात घेता दि. 15 नोव्हेंबरपासून शासनाने साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या दृष्टीने हंगामाकरिता आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे हंगाम 2024-25 साठी 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस नोंदीनुसार गाळपास आणणेचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी लागणारी पुरेशी तोडणी-वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.