शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकरातील ऊस खाक

सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी हद्दीतील दोन शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकर उसासह ठिबकसंच जळाल्याची घटना गुरुवारी (दि.४) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे एकूण ५० ते ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा ऊस कारखान्याला पाठविण्याच्या अवस्थेत होता. सरासरी ६० ते ६५ टन प्रति एकरी उत्पन्न अंदाज होता. संपूर्ण उसामध्ये ठिबक संचने पाणीपुरवठा केलेला होता.
सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील बेंबळे-हरिनगर येथील बागायतदार पोपट नामदेव अनपट व मच्छिंद्र नामदेव अनपट यांची टेंभुर्णी हद्दीतील शेतात गुरुवारी (दि.४) दुपारी १२ दरम्यान विद्यूत तारा एकमेकांवर स्पार्किंग झाल्याने त्याच्या ठिणग्या उडून अक्षय गायकवाड यांच्या शेतात पाचटावर पडल्या. हे पाचट पेटून पोपट अनपट व मच्छिंद्र आनपट यांचा आडसाली उसाला आग लागली. यात उस जळून खाक झाला आहे. अनपट बंधूंचे अंदाजे ५० ते ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांनी याचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.






