‘नॅचरल’च्या कर्मचाऱ्यांना २६ टक्के बोनस

धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजने आपल्या कामगारांना २६ टक्के बोनस जाहीर केला आहे. उद्योगाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी याबाबत घोषणा केली.
केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात आहे, असे ठोंबरे यांनी सांगितले. नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजच्या कामगार संघटना आणि संचालकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये बोनसबाबत चर्चा झाली, त्यावेळी ठोंबरे बोलत होते.
यावेळी ठोंबरे म्हणाले, मराठवाड्यातील साखर उद्योग ऊसाची उपलब्धता व पाणी टंचाई या दोन्ही समस्यांनी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या खाईत सापडलेला मराठवाड्यातील साखर उद्योग यशस्वी करून दाखविण्याचे काम नॅचरल शुगरने केले असून, तो नफ्यात आणण्याचे कौशल्य साध्य केले आहे आणि ते केवळ साखर कारखान्याबरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून आणि कर्मचारी व ऊस उत्पादकांच्या सहकार्यामधून झाले आहे. मला जे कांही द्यावयाचे आहे ते माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कर्मचारी बांधवांनाच द्यावयाचे आहे.
चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने कारखाना व्यवस्थापनाने निर्धारित केलेले ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.