एआयमुळे उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांची वाढ : ना. मकरंद पाटील

सातारा : एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला आवश्यक असणारा खताचा व पाण्याचा पुरवठा मिळतो. त्यामुळे अनावश्यक खर्चाचीही बचत होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (एआय) तंत्रज्ञानाच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप आले असून शेतकऱ्यांनीही शेतीसाठी आधुनिकतेचा वापर केला पाहिजे, असे मत ना. मकरंद पाटील यांनी व्यक्त केले. भूईंज येथील किसनवीर कारखाना कार्यस्थळावर एआय तंत्रज्ञान वापराबाबत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशीला जाधव, पिसाळ, कार्यकारी संचालक जितंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, दत्तानाना ढमाळ, संपतराव शिंदे, आत्माराम सोनावणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे शेती केल्यास ती फायदेशीर ठरणारी आहे. शेतकऱ्यांनीही स्पर्धेच्या युगात ऊस शेतीमध्ये एआय या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्यान जीवनात आर्थिक उन्नती होणार आहे. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (एआय) तंत्रज्ञानाच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप आलेले असून शेतकऱ्यांनीही शेतीसाठी आधुनिकतेचा वापर केला पाहिजे.