ओलीस ठेवलेल्या ४१ ऊसतोड मजुरांची अखेर सुटका; इंदापुरातील तिघांवर गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : ओलीस ठेवलेल्या २२ मजूर आणि १९ बालकांसह तब्बल ४१ जणांची सुटका करण्यात शनिवारी अखेर यश आले. यासंदर्भात मजुरांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.  त्यानुसार कारवाई करून इंदापूर तालुक्यातील संबंधित तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुकादमासह ट्रॅक्टर मालकांचा समावेश आहे.

कन्नड येथील संदीप ताराचंद ठाकरे व इतरांनी २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी स्वामी यांच्याकडे आमच्या काही नातेवाईकांना इंदापूर तालुक्यात डांबून ठेवल्याची तक्रार केली होती. ऊसतोडीच्या कामासाठी १६ ऑक्टोबर २०२४ पासून मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे व इंदापूर तालुक्यातील ट्रॅक्टर मालक यांच्यासोबत नातेवाईक असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

मुकादम आणि ट्रॅक्टर मालक यांनी मजुरांना ११ कोयते (२२ मजूर) मिळून १२ लाख रुपये उचल दिलेली होती. कामावर जाऊन ६ महिने होत आले तरी त्यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा मोबदला दिला नाही. अन्नधान्याचा पुरवठा नाही, जनावरांना चाऱ्या-पाण्याची सोय नाही. त्यामुळे एका गायीचाही मृत्यू झाला आहे. उलट ट्रॅक्टर मालक मजुरांकडेच ८ लाख रुपयांची मागणी करत असून, पैसे न, दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असे दाखल तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तत्काळ पुण्याचे जिल्हाधिकारी व कामगार कल्याण मंडळाच्या उपायुक्तांशी संपर्क साधला. इंदापूरचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी तत्काळ पथक पाठवून कामगारांना मुक्त करत पोलिस ठाण्यात आणले.

तिघांवर गुन्हा दाखल

विष्णू नारायण गायकवाड (रा. नेवपूर, ता. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ फेब्रुवारी २०२५ ते २६ मार्च २०२५ दरम्यान नजरकैदेत ठेवणे, काठीने पायावर मारहाण, महिलांना मारहाण केल्याबद्दल रघुनाथ धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर, विकास संजय देवकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »