53 साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला, ७३ लाख टन उत्पादन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ७३.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर ५३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यंदा उसाअभावी कारखाने लवकर बंद होत आहेत. सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी आतापर्यंत ७८६ लाख टन ऊस गाळप केले आहे.

2४ फेब्रुवारीपर्यंतचे हे आकडे आहेत. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, गत हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला, तर तर यंदा एकूण 200 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले. त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. मात्र यापैकी ५३ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. या मध्ये कोल्हापूर विभागातील 6, पुणे विभागातील 4, सोलापूर विभागातील 36, अहिल्यानगर विभागातील 1 तसेच नांदेड विभागातील 5 कारखान्यांचा समावेश आहे.
राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.33 टक्के इतका आहे. जो गतवर्षीच्या तुलनेत ०.६ टक्क्याने कमी भरला आहे.

मागील वर्षी याच काळात 892 लाख टन उसाचे गाळप करून 88.8 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.96 टक्के होता. एकूण १७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता.

कोल्हापूर विभागात 40 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 26 सहकारी आणि 14 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 193.28 लाख टन उसाचे गाळप केले असून, 21.2 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक 10.97 टक्के साखर उतारा आहे. विभागातील 6 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

पुणे विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात 183.9 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 172.84 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.39 टक्के आहे. या विभागातील 4 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

सोलापुर विभागात 45 कारखाने कार्यरत असून यामध्ये 17 सहकारी आणि 28 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 129 लाख टन उसाचे गाळप करून 10.4 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 8.06 टक्के आहे. विभागातील 29 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

अहिल्यानगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खासगी आहेत. या कारखान्यांनी 10२.५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ९० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.79 टक्के आहे. या विभागातील एका साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 13 सहकारी आणि 9 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 74.46 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 58 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा 7.79 टक्के आहे.

नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खासगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 90.09 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.51 टक्के साखर उताऱ्यासह 85.69 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 5 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.

अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून त्यात 1 सहकारी आणि 3 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 9.3 लाख टन उसाचे गाळप केले असून, 8.15 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.76 टक्के आहे.

नागपूर विभागात 3 खासगी कारखाने सुरु असून त्यांनी 2.63 लाख टन उसाचे गाळप करून 1.33 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.06 टक्के इतका आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »