उसाला ट्रक उलटला; ६ मजुरांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर खांडी येथे ऊसाच्या ट्रकला अपघात झाला असून, या दुर्घटनेत ११ कामगार ट्रकखाली अडकले, तर ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
उसाच्या ट्रकवर १७ मजूर बसून प्रवास करत असताना, अचानक ट्रक उलटल्याने सर्व मजूर त्याखाली दबले गेले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोमवारी पहाटे ही घटना पिशोर ते कन्नड मार्गावरील खाडी चंदन नाल्याजवळ घडली. किसन धर्मु राठोड (वय ३०), मनोज नामदेव चव्हाण (२३), कृष्णा मुलचंद राठोड (३०), मिथुन चव्हाण (२६), विनोद नामदेव चव्हाण (२८, सर्व रा. सातकुंड, ता. कन्नड) व ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण (३६, रा. बिलखेडा ता. कन्नड), अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती पिशोरचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांनी दिली.
पिशोर खांडी येथे ट्रक अचानक उलटल्याने सर्व मजूर ऊसाखाली दबले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.या अपघातात अनेक मजूर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. प्रशासनाकडून बचावकार्य करण्यात आले, ट्रक उलटण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.