देशभरात ७२० लाख टन गाळप
नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २९ कारखान्यातून गाळप सुरु झाले नसल्याने सुमारे १३१ लाख टन ऊस गाळप कमी झाले असून त्याच्या परिणामस्वरूप १३.५० लाख टन साखर उत्पादन गतवर्षीच्या या तारखेशी तुलना करता कमी झालेले दिसते.
सरासरी साखर उतारा देखील ०.२५ टक्क्याने कमी आहे. अर्थात आता पडलेली कडाक्याची थंडी आणि दिवसभराचे कडक ऊन पाहता हंगाम अखेर सुमारे २८० लाख टन निव्वळ नवे साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे जे गतवर्षी झालेल्या ३१९ लाख टन निव्वळ साखर उत्पादनापेक्षा ३९ लाख टनाने कमी होण्याचा अंदाज आहे. वरील २८० लाख टना व्यतिरिक्त जवळपास ४० लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
साखर उद्योगाचे प्रमुख प्रलंबित जे प्रश्न आहेत त्यापैकी साखरेच्या किमान विक्री दरातील वाढ आणि साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरातील वाढ या दोन प्रश्नांचा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ते मार्गस्थ झाले आहेत.
त्यावर पुढील दोन-तीन आठवड्यात निर्णय होणे अपेक्षीत आहे. साखर निर्यातीबाबत मात्र केंद्र शासन स्तरावर जानेवारी २०२५ अखेर झालेल्या साखर उत्पादनाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय होणे अनुमानित आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले आहे.