72 वा सहकार सप्ताह भरगच्च कार्यक्रमांनी साजरा

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे यंदाचा सहकार सप्ताह पुण्यात भरगच्च कार्यक्रमांनी पार पडला. या निमित्ताने विविध महाविद्यालये आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच शेवटी पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. सप्ताहामध्ये युवकांचा लक्षणीय सहभाग होता.
72 व्या सहकार सप्ताहाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींचे) पुणे येथे 14 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले. तर सांगता २0 नोव्हेंबर रोजी झाली.
या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी सहा वेगवेगळे एक वर्षाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. या महिलांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावे, स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा व त्यातून स्वतःची व आपल्या कुटुंबाची आर्थिक व सामाजिक उन्नती करता यावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

72 व्या सहकार सप्ताहाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य व नाशिकच्या यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य प्रसेनजित फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. डी. बी.पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिसभेचे सदस्य कृष्णा भंडलकर यांनी भूषविले होते.
प्रसेनजीत फडणवीस यांनी मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल विद्यापीठाचे , अध्यासनाचे व प्राध्यापक अनिल कारंजकर यांचे कौतुक केले व आभार मानले. मुलींनी व्यवसाय संधी शोधून अनेक नवनव्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास वाव आहे हे त्यांनी सह उदाहरण मार्गदर्शन केले. प्रा.डी बी पवार यांनी सहकराची ऐतिहासिक परिस्थिती विस्ताराने सांगत भारताच्या आर्थिक विकासा मध्ये महिलांचा सहभाग कसा असेल याचे विवेचन केले. या कार्यक्रमांमध्ये अध्यासनाचे प्राध्यापक डॉ अनिल कारंजकर यांनी भारतातील सहकार सुरू होण्याची कारणे, त्याचा विकास व सहकारातून समृद्धी येण्यासाठी सहकारामध्ये महिलांचा सहभाग कसा असला पाहिजे, त्यांचे हक्क काय आहेत- त्यांची कर्तव्य काय आहेत आणि यासाठी एकमेकास मदत करून गरजू नागरिक आपली आर्थिक व सामाजिक प्रगति कशी करू शकतात याची चर्चात्मक पद्धतीने विवेचन केले. डॉ. कारंजकर यांनी भारतीय लोकसंख्येत महिलांचा वाटा फार मोठा , जवळ जवळ निम्मे म्हणजे ,४९ % आहे व या हाताना सन्मान पूर्वक काम मिळाले तर भारताचे पंतप्रधान मा.नरेद्रभाई मोदी यांचे भारतास अर्थिक महासत्ता लवकरच बनवता येइल असे प्रतिपादन या प्रसंगी केले.
या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व 225 विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमात भाग घेतला व त्यानंतर निबंध स्पर्धेत सुद्धा तीस विद्यार्थिनींनी भाग घेतला. या कार्यक्रमासाठी कृष्णा भंडलकर यांचे विशेष सह कार्य लाभले. डी एस सावकार अध्यासनाचे प्रा.डॉ.अशोक कांबळे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय आर भिलेगांवकर, निदेशक जाधवसर व त्यांचे सहकारी त्याचबरोबर इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन कॉर्पोरेशनचे आनंद यादव व अंजली नवघणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सप्ताहाचा समारोप पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या सभागृहामध्ये २० नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. अनिल कारंजकर यांनी सर्वाचे स्वागत करताना, या सप्ताहाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. एमएससी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे डीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, तसेच ज्या महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम पार पडले त्यांचे प्राचार्य आणि सर्व संबंधित घटकांचेही आभार मानले.
याच कार्यक्रमात सहकार सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेमध्ये विजयी झालेल्यांना रोख पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
(सविस्तर वृत्त लवकरच)






