८५ साखर कारखाने ‘शंभर नंबरी’
पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा दुसरा टप्पा जोमात असताना, १५ जानेवारी अखेरीच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर ११७ कारखान्यांकडे चालू हंगामाची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्तालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
या हंगामात एकूण २०२ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या आकडेवारीनुसार, आतापर्यंत गाळप झालेल्या उसाची एफआरपी रक्कम १३ हजार ६४२ कोटी रुपये होते. यापैकी १३ हजार ५६ कोटीची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. हे प्रमाण सुमारे ९६ टक्के आहे. तर अद्यापही अनेक साखर कारखान्यांमधील ५८६ कोटींची रक्कम थकीत आहे. ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या ३६ आहे.
शेतकरी आंदोलनामुळे कोल्हापूर विभागात झालेला विलंब वगळता, राज्यात १ नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला. दरम्यान राज्यात सहकारी आणि खासगी अशा २०२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४४१.०२ लाख टन उसाचे गाळप केले आहे.
राज्यातील ८५ कारखान्यांनी ठरलेल्या दराप्रमाणे एफआरपी अदा केली आहे तर ५० कारखान्यांनी ६० ते ७० टक्के रक्कम अदा केली आहे. ११७ कारखान्यांची चालू हंगामातील एफआरपी थकीत आहे.