ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर अडकवण्याचा कट रचला जातोय!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राजू शेट्टी : जयसिंगपूरमध्ये होणार १६ ऑक्टोबरला ऐतिहासिक ऊस परिषद

जयसिंगपूर : सध्या उच्च न्यायालयात एकरकमी एफआरपीची लढाई जिंकली आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार व राज्य साखर संघ सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने या याचिकेस स्थगिती दिली नसली तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर अडकवण्याचा कट रचला जात आहे. यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुढे संघटित होऊन लढाई लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले. ते जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, या कार्यकर्ता मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऐतिहासिक २४ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर दि. १६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. या ऊस परिषदेनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटक याठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत.

सध्या शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून पिळवणूक होत असल्याचा गंभीर अरोप करत माजी खासदार शेट्टी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून ऊस दराच्या एफआरपीमध्ये वाढ झाली; मात्र शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झाला नाही. खते, बी -बियाणे, कीटकनाशके, मजुरी, मशागत व तोडणी-वाहतूक यामध्ये भरमसाट वाढ झाली. केंद्र सरकार व राज्य सरकार साखर उद्योगात दुर्लक्ष करू लागल्याने साखरेसह उपपदार्थांबाबत चुकीचे निर्णय होऊ लागले आहेत. राज्य साखर संघ व राज्य सरकार एकत्रित येऊन बेकायदेशीररीत्या एकरकमी एफआरपी मोडतोड करून दोन किंवा तीन टप्प्यांत देण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत, यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढाई लढण्याची गरज आहे.

या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, राजाराम देसाई, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्यान्नावर, आण्णासो चौगुले, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, जयकुमार कोले, महेश खराडे यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »