प्रतिटन ३,७५१ रूपये एकरकमी पहिली उचल द्यावीच लागेल

राजू शेट्टी : शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ऊस पाठवण्याची घाई करू नये
जयसिंगपूर : यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये. ३० जानेवारीच्या आत ऊस संपणार आहे. तोपर्यंतच कारखाने चालणार आहेत. टोळ्या, मशिन पळवापळवी करायच्या भानगडीत पडू नका. पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाला आहे. शेतात दुसरे पीक घेण्यासाठी कारखानदारांना जादा पैसे देऊन ऊस नेण्यास सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ व्या राज्यव्यापी ऊस परिषदेचे गुरुवारी जयसिंगपूरमधील विक्रमसिंह क्रिडांगणावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत एकूण १८ ठराव घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती.
यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये विनाकपात एकरकमी पहिली उचल देण्यात यावी. या मागणीवर कारखानदारांनी १० नोव्हेंबरपर्यंत विचार करावा. अन्यथा आम्ही ११ तारखेनंतर मैदानात उतरू. आमच्या मागणीवर २५ दिवसांत विचार करावा. चर्चेचे दरवाजे खुले आहेत, असेही शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकरीप्रश्नी राज्य सरकारचाही समाचार घेत जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही जर साखर सम्राटांसाठी लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात न्यायालयात लढला तर मातीत लोळवल्याशिवाय सोडणार नाही, असा थेट इशारा शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव घेत दिला.
कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा
कारखान्यांनी काटामारी थांबवावी. १० टक्के ऊस काटामारीत चालला आहे. जर ५ हजार टन ऊस गाळप करणारा कारखाना असेल तर दररोज ५०० टन काटा मारला जातो. यातून दररोज १५ लाख रुपये पैसा कारखानदारांच्या खिशात जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. सर्वच कारखानदारांची काटामारी मोठ्या प्रमाणात सुरू असून, दिवसाकाठी किती काटामारी केल्यानंतर कारखानदारांना किती फायदा होतो, याची आकडेवारी सांगितली. राज्यात केवळ २०० वर कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात ऑनलाईन पद्धतीने काटे बसवले तर याचा फायदा शेतकऱ्यांना अधिक होईल.
साखर आणि उसाचा दर सारखाच राहिला पाहिजे. कारखान्याचा साखरेचा सरासरी दर ४ हजार रुपये आहे. गेल्या वर्षीच्या उसाचे २०० रुपये द्यायला हवेत. ते इथेनॉल तयार करतात. साखरेचा दर वाढतच आहेत. पण शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर का नाही? असा सवाल त्यांनी केला.