ऊस, दुधाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी मोठे आंदोलन उभारणार

रघुनाथ पाटील : डिकसळ येथे ऊस व दूध परिषद
इंदापूर : ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. दुधातील भेसळ थांबवली तर दुधाला योग्य दर मिळू शकतो. मात्र, सरकारने भेसळ रोखण्यासाठी बनवलेला कायदा भेसळ करणाऱ्यांना पैसे भरून सुटका करून देणारा आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली आहे. डिकसळ (ता. इंदापूर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस व दूध परिषद शनिवारी पार पडली. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेला सुरेश खोपडे, डॉ. चंद्रकांत कोलते, पांडुरंग रायते, शिवाजी नांदखिले, अॅड. अजित काळे, कालिदास आपेट, सदाशिव कुरेशी उपस्थित होते.
रघुनाथ पाटील म्हणाले की, “२००९-१० मध्ये उसाला दुप्पट भाव मिळत होता, पण गेल्या १७ वर्षात ऊस दर स्थिर आहे. सरकारने उसाला योग्य भाव द्यावा किंवा दोन कारखान्यांमधील अंतर कमी करावे, जेणेकरून शेतकरी दुसऱ्या कारखान्यांकडून चांगला भाव मिळवू शकतील,” अशी मागणी एक लीटर गायीच्या दुधाच्या बदल्यात एक लीटर डिझेल आणि एक लीटर म्हशीच्या दुधाच्या बदल्यात एक लीटर पेट्रोल देण्याची मागणी त्यांनी केली.
ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष
महाराष्ट्रात ऊस कारखाने वाढत असले तरी साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून ऊस दर पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर होणार असल्याचा गंभीर आरोप रघुनाथ पाटील यांनी यावेळी केला आहे.