सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा नवा विक्रम!

२३ कारखान्यांकडून ३,००० रुपयांपेक्षा जास्त पहिली उचल जाहीर
सोलापूर: जिल्ह्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात यंदाचा गाळप हंगाम ऐतिहासिक ठरत आहे. जिल्ह्यातील तब्बल २३ साखर कारखान्यांनी ३,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची ‘पहिली उचल’ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात प्रथमच विक्रमी ३६ कारखान्यांमध्ये गाळप सुरू असून उसाला मिळणाऱ्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.
- दराची आकडेवारी : २३ कारखान्यांनी ३,००० रुपयांहून अधिक, तर ९ कारखान्यांनी २,८०० रुपयांपेक्षा जास्त दर जाहीर केला आहे.
- आघाडीचे कारखाने: ‘विठ्ठलराव शिंदे’ आणि ‘श्री पांडुरंग (श्रीपूर)’ या कारखान्यांनी दर जाहीर करण्यात आघाडी घेतली. त्यानंतर ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील’, ‘शंकर सहकारी’, ‘सासवड माळीनगर’ आणि ‘ओंकार शुगर’ समूहाच्या पाच कारखान्यांनी आपले दर घोषित केले आहेत.
- विक्रमी गाळप: सोलापूर जिल्ह्यातील एकूण ४० पैकी ३६ कारखाने यंदा मैदानात उतरले आहेत. ही संख्या जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.
- शेतकरी संघटनांचा प्रभाव: ऊस दरासाठी शेतकरी संघटनांनी दिलेला लढा आणि वाढती स्पर्धा यामुळे कारखानदारांना जादा दर देणे भाग पडले आहे.
काही कारखान्यांची नकारात्मक भूमिका:
एकीकडे बहुतांश कारखान्यांनी उच्चांकी दर जाहीर केले असताना, जिल्ह्यातील तीन कारखाने अशा आहेत ज्यांनी हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप दर जाहीर केलेला नाही. तसेच या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसेही थकवल्याने संताप व्यक्त केला जात आहे
जानेवारीपासून दरवाढ शक्यता ?
जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी २८०० ते २९०० रुपये दरम्यान ऊस दर जाहीर केला आहे. मात्र, यातील बऱ्याच कारखान्यांना उसाची कमतरता भासू लागली आहे. प्राधान्याने अधिक दर देणाऱ्या कारखान्यांवर शेतकरी ऊस देत आहेत. त्यामुळे काही साखर कारखान्याचा ऊस दर जानेवारीपासून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोणी किती दिला दर
1. ओंकार चांदापुरी, ओंकार म्हैसगाव, ओंकार (व्ही.पी.), ऑकार रुद्देवाडी, ओंकार (सहकार शिरोमणी), श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, श्री. विठ्ठल गुरसाळे, श्री. शंकर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, सीताराम महाराज खर्डी, सासवड माळीनगर, वृंदावन (जुना इंद्रेश्वर), राजवी आलेगाव, शिवगिरी, भैरवनाथ लवंगी, जकराया वटवटे, युटोपियन, अवताडे शुगर, आष्टी शुगर, श्री. संत दामाजी व सिद्धेश्वर सोलापूर यांनी तीन हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर जाहीर केला.
२. बबनराव शिंदे तुर्कपिंपरी, संत कुर्मदास, येडेश्वरी शुगर, विठ्ठल रिफायनरी, लोकनेते बाबुराव पाटील लोकमंगल बीबीदारफळ, सिद्धनाथ तिर्हे, धाराशिव (सांगोला सहकारी), भीमा टाकळी सिकंदर या साखर कारखान्यांनी २८०० ₹ व २८५० ₹ दर जाहीर केला आहे.
3. लोकमंगल भंडारकवठे या साखर कारखान्याने 3 प्रतिटन २७०० रुपयाने ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. जय हिंद आचेगाव, गोकुळ थोत्री, लोकशक्ती तेरामैल या साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केला नाही.





