एकरी १८० टन ऊस उत्पादनाचा विक्रम!

कुडची (बेळगाव) : आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर कुडची येथील प्रगतशील शेतकरी नईमुद्दिन पिंतोड यांनी एका एकरात १८० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांचा हा २६ फूट लांब आणि ५५ कांड्यांचा ऊस पाहण्यासाठी सध्या परिसरातून शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
भाजीपाला शेती सोडून ऊस शेतीकडे वळलेल्या पिंतोड यांनी सेंद्रिय खतांचा (शेणखत) वापर, ठिबक सिंचन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा वापर केला. माजी आमदार एस. व्ही. घाटगे आणि राज घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळवले असून, पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास भरघोस नफा मिळवता येतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
काय आहे खास?
उत्पादन: १८० टन प्रति एकर.
उसाची उंची : २६ फूट लांब.
कांड्यांची संख्या : ५५ कांड्या.
यशाचे गमक:
शेणखताचा जास्तीत जास्त वापर.
पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन (सिंचन पद्धतीत बदल).
रासायनिक खतांचा मोजका व योग्य वेळी वापर.
“शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर अशक्य काहीच नाही,” असा संदेश पिंतोड यांनी दिला आहे. अशा जिद्दी शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे!






