आजरा कारखान्याची वाहने स्वाभिमानी संघटनेने रोखली

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने गतवर्षीची थकीत एफआरपी त्वरित शेतकऱ्यांन देण्यात यावी आणि चालू गाळप हंगामाच्या उसाची पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजरा टोल नाक्याजवळ कारखान्यांची वाहने अडवून वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. आजरा कारखान्याकडून मागील हंगामातील थकीत एफआरपी, २०२२-२३ चा ५० रुपयांचा थकीत हप्ता आणि चालू हंगामाच्या उसाची पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये जाहीर केल्याशिवाय हंगाम सुरू करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी कारखाना प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारच्या एकरकमी एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या विरोधात राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात जाऊन शासनाचा जीआर रद्द केला आहे. त्यामुळे कारखान्याने एकरकमी एफआरपी द्यावी लागेल. कारखान्याने कार्यवाही न केल्यास साखर जप्ती आणि संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून घेण्याची नामुष्की ओढवून घेऊ नका, असा इशारा राजेंद्र गड्याण्णावर यांनी कारखाना संचालकांना दिला.
यावेळी कारखान्याच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. थकीत एफआरपीची रक्कम १५ नोव्हेंबरपर्यंत व २०२२-२३ चा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्याचे आश्वासन देत चालू वर्षीच्या पहिल्या उचलीसंदर्भात लवकरच भूमिका जाहीर करू, असेही सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे यांनी चर्चेत भाग घेतला. लेखीपत्र दिल्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले.






