ऊस शेतीसाठी AI, जयंत पाटील कृतिगटाचे प्रमुख

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा ऊस शेतीसाठी वापर करण्याकरिता एका कृतिगटाची स्थापना करण्याचा निर्णय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाने घेतला आहे. एआय मुळे ऊस उत्पादन आणि दर्जामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचा विस्तार करण्यासाठी कृती गट काम करेल.
‘व्हीएसआय’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. यावेळी प्रतापराव पवार, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डॉ. इंद्रजित मोहिते, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम, विवेक कोल्हे आणि संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील उपस्थित होते. या बैठकीत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने सादरीकरण केले. त्यावरील चर्चेत सर्वांनी सहभाग घेतला.
बारामती कृषी विज्ञान केंद्राने यशस्वी प्रयोग केले आहेत. केंद्राकडे उपलब्ध असलेल्या माहितीद्वारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. साखर उद्योग आणि शेतकरीही एआयमुळे तरणार आहेत. केवळ ऊस शेती डोळ्यासमोर ठेवून एआयचा वापर करायचा नाही तर इतर पिकांसाठीही तो फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा बैठकीत झाली. ऊस पिकांच्या उत्पादनवाढीसह साखर कारखान्यांमध्येही एआयचा वापर केला जाणार आहे. गाळप हंगाम लवकर आटोपल्याने साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
आगामी काळात ऊस क्षेत्र वाढण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या क्षेत्रामध्ये चांगले आणि दर्जेदार पीक कसे घेता येईल, यादृष्टीने उपाय सुचविण्यात आले. बारामतीत एक हजार शेतकऱ्यांना एआयच्या मदतीने ऊस शेती प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये उसाची लागवड, पाणी देणे अशा विविध बाबतींत अचूकता आली आहे. हा प्रयोग राज्यभर राबवून आगामी काळात राज्यातील ऊस उत्पादन वाढविणे शक्य असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
जयंत पाटलांवर जबाबदारी
कृतिगटाचे प्रमुख म्हणून जयंत पाटील यांच्याकडे; तर समन्वयक म्हणून शिवाजीराव देशमुख यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कृतिगटाची बैठक होत असून, त्यानंतर ऊसशेतीमधील विस्ताराची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे. कृतिगटामध्ये जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे, विशाल पाटील, इंद्रजित मोहिते, विश्वजित कदम यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे प्रतापराव पवार यांचा समावेश कृतिगटात केला आहे.