काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

अहिल्यानगर : राज्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही कारखान्यांच्या नफ्यातील मदत मागितली होती, परंतु काही साखर कारखाने मालकांनी याला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत. साखर कारखान्यांना म्हटले की, तीस-तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातून पाच रुपये हे शेतकऱ्यांसाठी बाजूला काढून ठेवा. ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. मात्र, आता मी असे काही कारखाने शोधून काढले आहेत. ज्यांच्याकडे शेतकऱ्याच्या मालाला काटा मारला जातो. अशा कारखान्यांवर आपण लवकरच कारवाई करणार असल्याचा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला आहे. लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान, लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शाह यांनी साखर उद्योगाचा साडेनऊ हजार 3 कोटी प्राप्तिकर माफ केला. मळीवरील २८% करही ५% वर आणला. यातून संजीवनी मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शाह यांनी अनेकांचा सहकार चळवळ हडप करण्याचा डाव हाणून पाडला.
प्रवरा परिवारातर्फे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटींचा धनादेश
दरम्यान, लोणी येथील प्रवरा परिवारातर्फे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटींचा धनादेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील, समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.