श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती

प्रशासक म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती
पुणे : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक नेमण्यात आला असून, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यावर प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती देण्यात आलेली होती. त्यानंतर कारखान्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी याचिकाकर्ते विश्वासराव भोसले यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारकडे केलेली होती, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी दिली.
अखेर त्यांच्या मागणीची नोंद घेत श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून फलटणच्या उपविभागीय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्रक पुणे विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी २० मार्च रोजी प्रसिद्ध केले आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या या सदोष असून सत्ताधाऱ्यांनी मुद्दामहून मतदार याद्यांमध्ये विविध गोष्टींचे समावेश केलेला नाही. त्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी राज्य सरकारकडे केलेली होती. त्यासोबतच विश्वासराव भोसले यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रिये बाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावादेखील दाखल केलेला आहे.