शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य नाही- राज्यपाल
शानदार सोहळ्यात शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार वितरण
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई – शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज आणि राष्ट्र निर्माण शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारे कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये पार पडला. या भव्य दिव्य कार्यक्रमात सन 2020, 2021 व 2022 या 3 वर्षातील एकूण 448 पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल महोदय बोलत होते.
ते पुढे म्हणाले, देशातील १४० कोटी लोकांना शेतकऱ्यांशिवाय भविष्य नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी शेतकरी ठामपणे उभा होता. त्यामुळे ते मोठा इतिहास रचू शकले, हा महाराष्ट्राचा महान इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याने राबवलेली १ रुपयात विमा योजना ऐतिहासिक आहे, अशा शब्दात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शासनाच्या कृषी योजनेचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकरी महाराष्ट्राचे खरे ब्रांड एम्बेसिडर आहेत. त्यामुळे यापुढे दरवर्षी त्यांचा कौतुक सोहळा होईल. पुरोगामी महाराष्ट्राला शोभेल अशा पद्धतीने पुरस्कार रक्कम चौपट वाढवली आहे. पाऊस जास्त झाल्याने होणारे नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू आहेत.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान उद्याच हस्तांतरित करण्यात येईल. त्यामध्ये 65 लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा योजनेत अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कांदा निर्यात बंदी बाबत सुद्धा मदत केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य आणि पुढचे बिल शून्य असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील, असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आश्वासित केले.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांना करून द्यावा त्यांनी समाजात कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे असे आवाहन केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्र शासनाला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून गौरविण्यात आले असल्याचे सांगून त्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमास आमदार विक्रम काळे, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, फलोत्पादन संचालक कैलास मोटे, कृषी संचालक विनायकुमार आवटे व इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले.
कौतुक सोहळा पाहण्यात रमले शेतकरी
कृषी पुरस्कारांच्या रकमेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेतला होता. तसेच पुरस्कार विजेत्यांना उपस्थित राहण्यासाठी दैनिक प्रवास भत्ता रक्कम सुद्धा वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सोहळ्यास राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी आपल्या वृद्ध आई-वडिलांसह आणि कुटुंबासह उपस्थित राहिल्याचे चित्र कार्यक्रम ठिकाणी दिसून येत होते. शेतातील लाल काळ्या मातीमध्ये काम करून थकले भागलेले शेतकरी आज मुंबईतील पंचतारांकित वातावरणात आपल्या मुलांचे कौतुक सोहळा पाहण्यात रमले होते.
भव्य दिव्य कार्यक्रम
महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या कर्तुत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात भव्यता दिसून आली. सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबासह शनिवारपासूनच मुंबईत येत होते. रविवारी सकाळपासून आधी सांस्कृतिक कार्यक्रम, चला हवा येऊ द्या फेम कलाकारांचा मनोरंजन कार्यक्रम पार पडला. पुरस्कार विजेते शेतकऱ्यांना फेटा बांधण्यात आला होता. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सांस्कृतिक वेशभूषा पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले शेतकरी लक्ष वेधून घेत होते.
मला शेतकऱ्यासोबत फोटो घ्यायचा आहे -राज्यपाल
पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना विमानाने इतरत्र जायचे होते. मात्र शेतकऱ्यांनी राज्यपाल महोदयांच्या हस्तेच पुरस्कार स्वीकारण्याचा आग्रह धरला. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपाल महोदयांना शेतकऱ्यांना आपल्या सोबत फोटो काढायचा असल्याने वेळ देण्याची विनंती केली. हा धागा पकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शेतकऱ्यांना माझ्यासोबत फोटो घ्यायचा नसून मला शेतकऱ्यांसोबत फोटो घ्यायचा आहे असे गौरवोद्गार काढले व पुढील कार्यक्रम रद्द करून राज्यपाल महोदयांनी पुढे एक तास सर्व शेतकऱ्यांना आपल्या हस्ते पुरस्कार वितरण केले.