विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा विक्रम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

प्रस्तावना: आपल्या साखर कारखान्यातील मिल सीझनमध्ये कायम चालू राहावी अशी कामगार आणि व्यवस्थापनाची मनोमन अपेक्षा असते. हीअपेक्षा फलद्रूप व्हावी म्हणून परंपरागत पद्धतीने काळजी घेतली जाते. परंतु आजच्या नवीन युगात, कमी खर्चात अधिक कार्यक्षमता अधिकाधिक उत्पादन, अधिक फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी साखर कारखानदारांच्या तिसऱ्या पिढीने मात्र ‘‘एकच ध्यास,एकच ध्यास”, “शून्य टक्के मिल बंद तास ” या संकल्पनेचा स्वीकार करून अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

शुन्य टक्के मिल बंद तास आणि
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा विक्रम

या संकल्पनेचा आज विचार करण्याची गरज आहे. ‘मिल स्टॉपेजेस’ हा कारखाना परिसरात चर्चेचा विषय असतो. कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापन त्यावर अवलंबून असते. ट्रकमालक, चालक, ऊसतोड यंत्रणा, सभासद यांच्या मिळकतीवर त्याचा थेट परिणाम होतो. मिल बंदमुळे प्रोसेसमध्ये मालाची प्रत बिघडते. प्रोसेसमध्ये ‘इंटरमिडियट प्रॉडक्ट’ची प्रतवारी बिघडते.

परिणामी साखरेची क्वॉलिटी किंवा दर्जा खराब होते. त्यामुळे उत्पादन कमी होते. मोलॅसेसचे प्रमाण वाढते. तोडलेल्या उसाची प्रत बिघडते. मशिनरी रिपेअरचा खर्च वाढतो. मिल बंद पडू नये म्हणून उपाययोजनेवर विचार सुरू होतो. त्यात प्रामुख्याने अनपेक्षित मिल बंद तास, मानवी चुका,मालाची खराबी, संसाधनांचा गैरवापर, कामगारांची कार्यक्षमता, आर्थिक पाठबळ यांचा ‘मिल बंद तास’ काळात अवाजवी वापर करावा लागतो.

हे सर्व टाळण्यासाठी शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेचा तांत्रिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. तो मी एकट्यानेच नाही, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन का करु नये? खरं म्हणजे कारखान्यात यावर सखोलपणे अभ्यास झाला पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल अशी अवस्था आहे.

शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, गुजरातमध्ये नर्मदा शुगर फॅक्टरीत सीझन २२/२३ मध्ये एकुण मिल बंद तास फक्त 2.62% आहेत. याचा अर्थ प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. फॅक्टरी व्यवस्थापनाला याबद्दल धन्यवाद देतो. त्यांचा उपलब्ध झालेला डेटा खाली देत आहे.

एकुण मिल चालूचे तास = ३८३० तास,
एकुण मिल बंद तास = १०३ तास,
मिल बंद तास प्रमाण = 2.62%

आमच्याकडे सीझन 22-23 मधील शून्य टक्के मिल बंद तास या आमच्या संकल्पनेची अंमलबजावणी दर्शवणारा आणखी एक साखर कारखाना :
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, लि. पिंपळनेर, जिल्हा – सोलापूर, महाराष्ट्र.
एकुण मिल चालूचे तास (सीझन २०२२-२३) = 3562 तास
एकूण मिल स्टॉपेज सीझन (सीझन २०२२-२३) = 20 तास.
मिल स्टॉपेज प्रमाण (बंद तास) = 0.561%

उपरोक्त डेटा सूचित करतो, की प्रतिबंधात्मक देखभाल, योग्य ऊस पुरवठा आणि कार्यक्षम व्यवस्थापनाचे सांघिक कार्य या दृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास ‘शून्य डाऊनटाइम’ची नवीन संकल्पना निश्चितपणे साध्य होईल.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन करताना मला आनंद होत आहे, की त्यांनी साखर उद्योगातील कमीत कमी टक्के मिल स्टॉपेजेसच्या कालावधीचा एक नवा विक्रम केला आहे.

ब्रेकडाउन मेनटेन्सचा खर्च-
5000 TCD साखर कारखान्यातील सिझनमध्ये 4000 कामकाजाचे तास गृहित धरून आणि 10% एकूण मिल बंद तास विचारात घेऊ. एकूण 10% मिल बंद तास पैकी ५% ब्रेकडाऊन स्टॉपेजेस वाचवणे शक्य आहे. 4000 कामकाजाचे तास × 5 %, ब्रेकडाऊन स्टॉपेजेस = 200 मिल बंद तास हे प्रतिबंधात्मक देखरेखीद्वारे वाचवू शकतात.

ब्रेकडाऊनची दर ताशी किंमत 1,50,000/-रु प्रति तास आहे. त्यानुसार ब्रेकडाऊनची एकूण किंमत रुपये 1,50,000 x 200 तास = 300,00,000/-रुपये प्रति हंगाम एवढी मोठी असेल. अशा प्रकारे प्रत्येक हंगामात रु. तीन कोटीची बचत होईल. या हेतूसाठी आम्हाला केवळ प्रतिबंधात्मक देखभाल मार्गाने देखभाल करावी लागेल.

उर्वरित 5 टक्के स्टॉपेजेसचे विभाजन पुढीलप्रमाणे करता येईल
अ) क्लीनिंग स्टॉपेजेस – 3 टक्के
ब) पावसामुळे – 1 टक्का
क) अनपेक्षित – संप, जत्रा, रस्ता रोको, शेतकरी आंदोलन – 1 टक्का

स्टॅन्डबाय इव्हॉपोरेटर सेटची उभारणी
अ) क्लीनिंग स्टॉपेजेस – या प्रकारच्या स्टॉपेजेसमध्ये कपात करण्यासाठी स्टॅन्डबाय इव्हॉपोरेटर सेटची उभारणी करणे आवश्यक आहे. तसेच स्टॅन्डबाय सल्फर भट्टी, सेंट्रीफ्युगल मशीन, स्टॅन्डबाय ड्रॉईव्हमोटर – लेव्हलर,-फायबरायझर, आय डी फॅन इ.साठी आवश्यक आहे.

ब) पावसामुळे येणारे स्टॉपेजेस – यासाठी पुढीलप्रमाणे उपाय योजना करता येईल. संपूर्ण फीडर टेबल -अनलोडरला संपूर्ण शेड उभारल्यास पावसातही केनफीडिंग चालू राहू शकते. अशी व्यवस्था कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि बलसाड शुगर फॅक्टरी गुजरात येथे आहे.

क) अनपेक्षित स्टॉपेजेस – जागरूक व्यवस्थापन त्वरित पर्यायी उपाययोजना करून हे स्टॉपेजेस टाळू शकते.

प्रगत स्वरूपाची देखभाल-
वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रगत स्वरूपाची देखभाल करणे गरजेचे आहे.
देखभाल – कोणतीही देखरेख क्रिया, जसे की तपासणी, सर्व्हिसिंग किंवा पार्ट बदलणे, जे ठरविलेल्या योजनेचा भाग म्हणून केले जाते, ते देखभाल मानले जाऊ शकते.

देखभालीचे प्रकार पूर्वानुमानित देखभाल (प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स) : प्रतिबंधात्मक देखभाल- (प्रिव्हेन्टिव्ह मेंटेनन्स) : ब्रेकडाऊन मेंटेनन्स (मिल बंद काळातील देखभाल) –
प्रतिबंधात्मक देखरेखीचा हेतू– वापरातील घटक किंवा भाग तपासून आणि ते खराब होण्यापर्वी त्यांची दुरुस्ती करून किंवा पुनर्स्थापित करून बसविणे. एक प्रभावी प्रतिबंधात्मक देखभाल कार्यक्रम हा उत्पादन डाऊनटाइम मर्यादित करण्यास आणि उपकरणे आणि सुविधांचे सेवा ,आयुष्य वाढविण्यास मदत करू शकतो.

प्रतिबंधात्मक देखभाल ही एक सोपी कल्पना आहे. पण अनेक सोप्या कल्पनांप्रमाणे, ती प्रत्यक्षात अमलात आणणे आव्हानात्मक असू शकते.

प्रत्यक्षात, हा प्रतिबंधात्मक देखभाल कार्यक्रम बऱ्यापैकी गुंतागुंतीचा असतो. मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण करायचे असते. वेळापत्रक, प्राधान्य आणि खर्च करण्याची आवश्यकता, अभियांत्रिकी ,अर्थशास्त्र, कामगार, व्यवस्थापन असे अनेक महत्वाचे घटक विचारात घ्यावेत. प्रतिबंधात्मक देखभाल कार्यक्रम प्रभावी होण्यासाठी, प्रत्येक घटक चांगले काम करत असावा.

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ब्रेकडाऊन कमी करण्याचे उपाय

  • दुरुस्तीची किंमत संकलित केली जावी, वेगवेगळ्या मशीनच्या दुरुस्तीसाठी खर्च कमी करण्याच्या शक्यता शोधण्यासाठी कायम दुरुस्तीसाठी येणारा खर्च गृहित धरून, मशीनच्या नावे रक्कम टाकावी. यामुळे ऑफ – सीझन देखभालीचा डाऊनटाइमचा खर्च कमी करण्यास मदत होईल.
    दुरुस्तीसाठी लागलेल्या वेळेचे रेकॉर्ड विरुद्ध त्यासाठीच्या स्टँडर्ड वेळेपेक्षा जास्त विलंब होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि खर्चाची बचत करण्यासाठी OEM कडून सुटे भाग खरेदी करावे, परिणामी झीज कमी होऊन मशीनरीचे आपोआप ब्रेकडाऊन थांबतात.
    नॉन -क्रिटिकल मशीनसाठी वार्षिक देखभाल कंत्राटी पध्दतीचा वापर करावा. उदा.-चुना तयार करणे. देखभाल कर्मचाऱ्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्य सुधारण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षित केले पाहिजे, जेणेकरून देखभाल खर्च आणि डाऊनटाइम कमी होईल.
  • प्रचंड डाऊनटाइम खर्च वाचवण्यासाठी, दुरुस्ती न करता काही विशिष्ट यंत्रे बदलली पाहिजेत. उदाहरणार्थ – स्लॅट, स्प्लीट पीन, फ्युज.
  • वेळ कमी लागण्यासाठी वेगवेगळ्या प्राधान्यांसह वेगवेगळ्या यंत्रांची देखभाल करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. (Prevention is better than cure)
    मशीनरीचे वार्षिक फेरबदल करताना, CPM-PERT तंत्रांचा वापर करून शटडाऊन खर्चाची तुलना क्रशिंग कॉस्टशी करावी आणि नुकसान कमी करण्यासह क्रशिंग कॉस्टची तुलना केली पाहिजे.
  • वारंवार झीज झाल्यामुळे यंत्रसामग्रीचे काही सुटेभाग बदलावे उदाहरणार्थ : वायर रोप. डाऊनटाइम टाळण्यासाठी आणि टार्गेटेड क्रशिंग होण्यासाठी महत्वाचे स्पेअर्स स्टॉकमध्ये ठेवावेत किंवा स्टँडबाय व्यवस्था करावी.
  • विशिष्ट सुटे स्पेअर्ससाठी सेंट्रल स्टोअरची संकल्पना उदा. टर्बाईन रोटर, बेअरिंग, मोठ्या क्षमतेच्या मोटर्स, परस्पर संमतीने जवळच्या साखर कारखान्यांवर स्पेअर्ससाठी सेंट्रल स्टोअर करणे जरूरीचे आहे. यामुळे खर्चाचे विभाजन होते. डाऊनटाइम कमी करून खर्च कमी होईल.
  • शिफ्ट इंजिनिअर हे अनुभव आणि निरीक्षण या आधारावर समस्या ओळखू शकतात. त्यांनी डाऊनटाइम कमी करण्यासाठी त्वरित देखभाल केली पाहिजे. यामुळे डाऊनटाइम कमी होईल, परिणामी खर्च कमी होईल आणि अधिक बचत होईल.
  • मिल बंदच्या मूळ कारणाचे निराकरण केले पाहिजे. उदाहरणार्थ: खराब मटेरिअल, ऑपरेशनविषयी माहिती नसणे, योग्य डिझाईन न निवडणे इ.

इंजिनिअर आणि केमिस्टची जबाबदारी

  • मशिनरीच्या वापरानुसार देखरेखीचे सिझन/ऑफसिझनचे वेळापत्रक बनवा. उदा- इव्हॅपोरेटर क्लीनिंग, चैन फिटिंग, मिल फिटिंग इ. कर्मचाऱ्यांना देखरेखीसाठी जबाबदार बनवा.
  • केले जाणारे प्रतिबंधात्मक देखभाल कार्य उपकरणांसाठी फायदेशीर असल्याची खात्री करा.
  • मोठे स्टॉपेज टाळण्यासाठी क्लाीनिंगसारख्या आगाऊ योजना करा.
  • देखभाल व्यवस्थेसाठी तुमच्या उपकरण निर्मात्याला विचारा.
  • स्पेअर पार्ट्स आवश्यक असण्याआधीच खरेदी करा.
  • कर्मचार्‍यांना कंपनी इंजिनिअरकडून शिकू द्या/माहिती घ्या.
  • कंपनी इंजिनिअर तपासणी रेकॉर्ड करेल याची खात्री करा.
  • उपकरण मॅन्युअल/ड्रॉईंग, नकाशे, महत्वाचे जिग फिक्श्चर योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत,
  • व्यवस्थापन प्रतिबंधात्मक देखभाल करण्यासाठी वचनबद्ध असल्याची खात्री करा. मेन्टेनन्सचा बारचार्ट तयार करा. त्यानुसार माल-सामान आणि मॅनपॉवरची व्यवस्था करा.
  • लागणाऱ्या मटेरिअलची निर्धारित वेळेपूर्वी मागणी करा. त्यासाठी पाठपुरावा करा. कामाच्या प्रगतीची कामगारांशी दैनिक आणि साप्ताहिक चर्चा करुन अडचणी दूर करा. कामासाठी योग्य आणि सुरक्षित वातावरण ठेवा.
    कामात होणाऱा विलंब वरिष्ठाच्या नजरेस आणून त्यावरील उपाययोजना निश्चित करा.
    दररोज कामाची लॉगबुकमध्ये नोंद करू न सही करा.
    नवनवीन टेक्नॉलॉजीबद्दल कामगारांशी चर्चा करा.
    बाह्य जगातून ज्ञान मिळवून स्वत: निष्णात व्हा.
  • देखभाल कामाचे स्वरूप काळ, काम आणि वेगाच्या सूत्राने निश्चित करून मनुष्यबळाचा वापर करा.
    देखभाल-मशीनची स्थिती पूर्ववत ठेवणे, तसेच उत्पादनासाठी मशीन तयार ठेवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना मशीनची देखभाल म्हणतात.

साखर उद्योगात देखभालीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत,
१. पूर्वानुमानित देखभाल (प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स)
२. प्रतिबंधात्मक देखभाल( प्रिव्हेन्टिव्ह मेंटेनन्स)
३. मिल बंदकाळातील देखभाल (ब्रेकडाऊन मेंटेनन्स)

शुगर फॅक्टरीमध्ये प्रतिबंधात्मक देखभाल खालील प्रमाणे युनिटनिहाय केले जावे…

1) ऑफ सीझन वर्क (प्रतिबंधात्मक देखभाल)

2) पिरियॉडिकल क्लिनिंग (पूर्वानुमानात्मक देखभाल)

(3) साप्ताहिक काम (प्रतिबंधात्मक देखभाल)

4) दैनिक/शिफ्ट कार्य (प्रतिबंधात्मक देखभाल)

प्रतिबंधात्मक देखभालीचे फायदे –
देखभाल करण्यासाठी ब्रेकडाऊनचे मूळ कारण शोधले जाऊन त्यावर उपाययोजना होते. उदा.कंपन, तापमान,अनावश्यक आवाज.
मशिनरीची देखभाल करण्यासाठी आगाऊ टाईमटेबल बनविणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक देखरेखीसाठी काळ, काम आणि वेगाचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. उपलब्ध कुशल मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ, कार्यक्षम व्यवस्थापन मशिनरीची देखभाल करण्यासाठी खूप गरजेचे आहे. मशिनरी १०० टक्के फुल स्पीडने, निर्धारित क्षमतेने विना अडथळा चालवून ‘क्वॉलिटी’ उत्पादन मिळविता येते.

अधिक उत्पादनासाठी डाऊनटाइम मर्यादित करा, “इमर्जन्सी मोड” मध्ये जाण्यास प्रतिबंध करा. यामुळे ऑपरेशन आणि देखभाल खर्च कमी होतो.
आरोग्य आणि सुरक्षिततेचे नियमांचे पालन केल्याने प्रतिबंधात्मक देखभाल करण्यासाठी मदत होते. ऑईल/ग्रीसच्या वापरावर नियमित लक्ष द्यावे.
प्रतिबंधात्मक देखभालीमुळे गुणवत्ता,कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते. वेळ आणि खर्च वाचतो. लॉसेस कमी होतात. रिकव्हरी वाढते. प्रतिबंधात्मक देखभालीने कंपनीच्या उपकरणांचे आयुष्य वाढते. त्यासाठी योग्य/आवश्यक देखभाल आणि तपासणी जरूर करा.

अपेक्षित परिणाम (रिझल्ट) मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मजबूत कार्यवाही/अंमलबजावणी करा.
तेव्हा शून्य टक्के मिल बंद तास हा संकल्प आपल्यापासून दूर नाही, अशी आपली खात्री होईल.

साखर उद्योगाचा प्रचंड प्रतिसाद-
महाराष्ट्रातील साखर उद्योगातील कामगार आणि अधिकारी यांना शून्य टक्के मिल बंद तास या विषयावर तांत्रिक बाबतीत शास्त्रीय मार्गदर्शन करण्याचा उपक्रम मी महाराष्ट्रात हाती घेतला असून, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या माहितीसाठी वरील विषयावर व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजिलेल्या साखर कारखान्याची यादी खालील प्रमाणे आहे.

1) श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना
2) व्यंकटेशकृपा शुगर मिल लिमिटेड
3) सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना
4) नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड
5) समर्थ सहकारी साखर कारखाना, युनिट नं.1
6) समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट नं. 2
7) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, युनिट नं.1
8) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, युनिट नं. 2
9) सासवड माळी साखर कारखाना लि.माळीनगर.
10) पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर.
11) द्वारकाधीश साखर कारखाना, युनिट 1आणि 2.
12) सद्गुरु श्री रविशंकर साखर कारखाना लि.राजेशाही.
13) लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, खतेलगाव.
14) श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर.
15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना,अरविंद नगर.

कारखाना कर्मचारी आणि अधिकारी यांना मशिनरी देखभाल दुरुस्तीसाठी आणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंटसाठीच्या मार्गदर्शनाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

याशिवाय कर्नाटकातील बंगळुरूजवळ मंड्या येथे दहा साखर कारखान्यासाठी वरील व्याख्यान निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिटय़ूट बेळगावी यांनी आयोजित केले होते. यापुढेही बऱ्याच कारखान्यावर व्याख्याने आयोजित होणार आहेत.

  • वा.र. आहेर (बी.ई. एम.आय.ई.)
    माजी तांत्रिक सल्लागार, एसटीएम प्रोजेक्ट लि.नवी दिल्ली.
    संचालक, डीएसटीए,पुणे
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »