विरह भावगीत

सांगा हो सजना, काय करता?
माझ्यापासून दूरच राहून ।।
इथं मी एकटी कशी राहाते?
तुझ्या विरहाचे अश्रू ढाळून ।।१।।
काय सांगू दिलाच्या दिलवरा,
तुझ्यापासून मी दूर राहून ।।
तुझ्या भेटीचीच वाट पाहते,
माझ्या देवाला साकडे घालून ।।२।।
काय जाहले आज तुजला गं?
सखी विचारी खोदून खोदून ।।
काय करणार मी विरहिणी,
बघे तयांना मी मुक होऊन ।।३।।
मजबुरी तुझी, लाचारी माझी,
फक्त उसासेच टाकत होते ।।
राजसा ते कसे दिवस होते,
त्या आठवणीत रमवत होते ।।४।।
विरहाचा काळ वाईट जाई,
पण त्याची मजा औरच येई ।।
थोडं रूसणे, थोडे फुगणे,
वाटे ते मला रोमांचक लई ।।५।।
या प्रेमाची काय चीज असते?
सुख-दु:खात सारखे असते ।।
जुन्या आठवणींना उजाळते,
तेव्हा मी जवळ येत असते ।।६।।
— आहेर वाळू रघुनाथ, नाशिक