आहेर यांचा कवितेचा बॉयलर पेटला : बोरस्ते
नाशिक:- तांत्रिक सल्लागार श्री.आहेर यांनी साखर उद्योगात कार्य करत असताना कवितेची आवड जोपासली. म्हणजेच त्यांच्या कवितेचा बॉयलर नक्कीच आता पेटलेला असून, कवित्वाचा पूर्ण हंगाम त्यांनी यशस्वी करावा. कारण काव्य हा आत्मानुभूतीचा निरंतर प्रवास आहे, असे उदगार ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी काढले.
कवी वाळू आहेर यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात त्यांच्या भालचंद्र प्रकाशन प्रकाशित ‘अंतरीचे बोल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक उमाकांत कुलकर्णी, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार,मुखेड विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष विश्वासराव आहेर, कवीश्री.ढिकले , सौ.छाया आहेर उपस्थित होते.
श्री.बोरस्ते पुढे म्हणाले की, ‘अंतरीचे बोल’ या काव्यसंग्रहात जीवनानुभवाचा परीघ उलगडून दाखवला आहे. भक्ती, देशभक्ती, ऊस व्यवसाय आणि पारिवारिक सदस्यांविषयीच्या भावना कवीने व्यक्त केल्या आहेत. तसेच साखर कारखानदारी धोक्यात असताना आपण साखर उद्योगातील व्यक्तींना करत असलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दात वाळू आहेर यांचा गौरव केला.
प्रमुख पाहुण्यांसह राजेंद्र आहेर, कविता आहेर, दिनकर आहेर, कैलास आहेर, रामहरी संभेराव, डॉ.रोहिणी कापसे, अशोक कुलकर्णी, गोकुळ लांडगे, आरोह कापसे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू योगेंद्र नेरुरकर यांनी कवी वाळू आहेर यांना आशीर्वाद दिले.
साखर उद्योगातील श्री.जे.व्ही. मोरे,लांडगे,श्री.केशव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.कवी वाळू आहेर यांनी आपली वाटचाल सांगत आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सुप्रिया आहेर, नमिता कापसे यांनी संयोजन केले. डॉ.अजय कापसे यांनी आभार मानले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.