वारी आषाढीची

सावळ्या हरीसाठी |
गंध टिळा लावीन||
रोज पायी चालेन|
मी वारीला जाईन||१||
माझ्या विठूचा विठूचा|
गजर हरिनामाचा||
ज्ञानोबा तुकारामांचा||
झेंडा रोवीन प्रेमाचा|| २||
ठेवी कर कटीवरी|
राही उभा विटेवरी||
झाली युगे अठ्ठावीस|
देवा पुंडलिका द्वारी||३||
चंद्रभागेत स्नान |
पुंडलिका भेटेन||
नामदेव पायरी|
आनंदाने पुजिन||४||
मग दर्शन सोहळा|
विठू माझा सावळा||
तुळशीहार गळा|
माथी कस्तुरीचा टिळा ||५||
वैजयंती माला शोभे|
कंठी कौस्तुभ मणी||
कासे पितांबर कटी |
मकर कुंडले कानी||६||
मज हर्ष जाहला|
चरणस्पर्श होता ||
जडू दे तुझी प्रीती ||
सदा माझिया प्रति||७||
मायबाप गुरु,सखा |
तुच माझा पाठीराखा ||
पाहिले म्या समचरण |
हेच माझे तीर्थाटन ||८||
आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)