ऊस सर्वेक्षणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची मदत घेणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर आयुक्तालय ऊस सर्वेक्षणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करून ऊसाच्या स्थितीबद्दल माहिती दर महिन्याला घेतली जाणार आहे.

ऊस गाळपाचे वेळापत्रक निश्चित करताना राज्यभरातील ऊसाचे क्षेत्र, त्याचे उत्पादन याबद्दलचा अंदाज महत्वाचा ठरत असतो. त्यातून समोर येणाऱ्या आकडेवारीवरून गाळप हंगामाचे नियोजन केले जाते. मात्र याआधी अनेकवेळा आकडेवारी चुकली आहे. त्यामुळे राज्यशासन आणि साखर आयुक्तालयाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ऊस सर्वेक्षणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकल्पासाठी आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात तीन वर्षांसाठी सहा लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पामुळे राज्यातील तालुकानिहाय झालेली ऊसाची लागवड, ऊसाचे प्रकार, उत्पादन, मातीमध्ये असणारा ओलावा आणि ऊस उत्पादकता याची माहिती साखर आयुक्तालयाला प्राप्त होणार आहे. त्याच बरोबर ऊसाची सिंचन पद्धत, अन्नद्रव्य, कीड आणि रोग व्यवस्थापन याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

साखर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदा 13 लाख हेक्टरहून अधिक ऊस उपलब्ध आहे. उस लागवडीखाली असणारे क्षेत्र निश्चित करण्यासाठी साखर कारखाने, कृषी विभाग, साखर आयुक्तालयाचे अभ्यासक एकत्र येत असतात. त्यांच्याकडून मिळणारी माहिती बिनचूक मिळण्याची शक्यता जास्त असते. परंतु तरी सुद्धा आणखी खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यातून खात्रीशीर माहिती मिळण्यास मदत होईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »